मीरा-भाईंदर महापालिकेला उमगले कांदळवनाचे महत्त्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 12:44 AM2019-06-04T00:44:04+5:302019-06-04T00:44:27+5:30
संवर्धनाविषयी दिली माहिती : लागवडीसाठी एक कोटींचा प्रस्ताव
मीरा रोड : एरव्ही, कांदळवनाचा ºहास करण्यात आघाडीवर असलेल्या मीरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकारी, ठेकेदारांवर अनेक गुन्हे दाखल असतानाच आयुक्तांनी दिलेल्या प्रस्तावात कांदळवनाच्या अनन्यसाधारण महत्त्वाचे भरभरून कौतुक करण्यात आले आहे. कांदळवनाची तीव्र गरज आणि त्याच्या संरक्षण व संवर्धनाचं महत्त्व व्यक्त करतानाच यंदाच्या वर्षात महापालिका कांदळवनलागवडीसाठी एक कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. २०११ साली शहरातील २०.७ चौकिमी क्षेत्र हे कांदळवनाखाली होते आणि कांदळवनाच्या नऊ जाती आढळून आल्याकडे आयुक्तांनी लक्ष वेधले आहे.
मीरा-भाईंदर शहरांच्या उत्तर दिशेला वसई खाडी, तर दक्षिणेला जाफरी खाडी आहे. पश्चिमेला समुद्र, तर पूर्वेला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. खाड्या आणि त्यांच्या उपखाड्यांच्या परिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात दाट कांदळवन आहे. या दाट कांदळवनात सोनेरी कोल्ह्यासह अनेक प्राणी, पक्षी, जलचर-मासे यांचे अस्तित्व आहे. जलप्रदूषणासह हवेतील कार्बन शोषण्याची या कांदळवनाच्या झाडांची क्षमता कमालीची आहे. कांदळवनाची तोड व त्यातील भराव-बांधकामे हे पावसाळ्यात होणाऱ्या पूरस्थितीचे प्रमुख कारण आहे. देशाच्या घटनेत नैसर्गिक पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी नेमून दिली आहे. याशिवाय वन, सीआरझेड कायद्यांसह शासन व न्यायालयाच्या आदेशांमध्ये सातत्याने कांदळवन संरक्षित करण्यात आले आहे. परंतु, मीरा-भाईंदरमध्ये मोठ्या प्रमाणात कांदळवनाच्या होणाºया ºहासाला महापालिका व लोकप्रतिनिधी कारणीभूत ठरले आहेत. महापालिका अधिकारी व ठेकेदारांवर पर्यावरण ºहासाचे अनेक गुन्हे दाखल असून अद्याप अनेक तक्रारी प्रलंबित आहेत. त्यातच, पालिकेकडून एमसीझेडएमए, न्यायालय, शासन आदींची दिशाभूल करणारी माहिती देऊन परवानग्या मिळवण्याचे प्रकारदेखील समोर आलेले आहेत. मात्र, आयुक्त बालाजी खतगावकर यांनी कांदळवनाबाबत महासभेत दिलेल्या प्रस्तावात कांदळवनाचे अनन्यसाधारण महत्त्व व त्याची नितांत आवश्यकता नमूद करून प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या डोळ्यांत अंजन घालण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते.
आयुक्तांनी कांदळवनलागवडीसाठी एक कोटी रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव सादर केला आहे. कांदळवनाच्या झाडांची माहिती व वैशिष्ट्ये मांडत जमीन आणि समुद्रातील बफर झोनचे तटरक्षकाचे काम ते करते. दाट कांदळवनामुळे हिरवी भिंत निर्माण होते. जागतिक तापमानवाढीमुळे होणाºया नैसर्गिक आपत्तीपासून ते संरक्षणाचे काम करते. वनस्पती व जीवसृष्टीचे संरक्षण-संवर्धन करते. मासे, खेकडे, कोळंबी आदी कांदळवनात अंडी टाकतात. जैवविविधतेमध्ये वाढ होऊन संपूर्ण जीवनसाखळी यात आकाराला येते, असे आयुक्तांनी म्हटले आहे. पश्चिम बंगालच्या सुंदरबनचा हवाला देत मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात कांदळवनाची लागवड करून देखभाल करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे.
पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार प्रदूषणमुक्त आणि आरोग्यपूर्ण जीवन जगणे, हा प्रत्येक नागरिकाचा हक्क असल्याचे नमूद करत आयुक्तांनी कांदळवन संरक्षण आणि संवर्धनाबाबत उच्च न्यायालयासह शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांचा संदर्भसुद्धा आवर्जून दिला आहे. महापालिकेच्या या भूमिकेमुळे पर्यावरणप्रेमींना सुखद धक्का बसला आहे.
उशिराने का होईना, महापालिकेला कांदळवनाचे महत्त्व समजले, याबद्दल आनंदच आहे. पण, निव्वळ दिखावा न करता महापालिकेने आतातरी शहर व नागरिकांच्या हितासाठी नैसर्गिक कांदळवनाचे काटेकोर संरक्षण करण्यासाठी कठोर पावले उचलावीत. सर्व नगरसेवक, पालिका अधिकारी-कर्मचारी, ठेकेदार, बिल्डर व सामाजिक आणि गृहनिर्माण संस्थांमध्ये कांदळवनाचे अनन्यसाधारण महत्त्व पटवून देण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन करावे. धार्मिक स्थळे, महाविद्यालयीन व शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी.
रोहित सुवर्णा (माजी नगरसेवक)