आणखी चार पेट्रोलपंपांवर छापे
By admin | Published: July 4, 2017 05:29 AM2017-07-04T05:29:28+5:302017-07-04T05:29:28+5:30
घोटाळेबाज पेट्रोलपंपांविरुद्ध ठाणे पोलिसांनी सुरू केलेल्या धडक कारवाईअंतर्गत सोमवारी चार पंपांवर कारवाई केली. या कारवाईमुळे
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : घोटाळेबाज पेट्रोलपंपांविरुद्ध ठाणे पोलिसांनी सुरू केलेल्या धडक कारवाईअंतर्गत सोमवारी चार पंपांवर कारवाई केली. या कारवाईमुळे राज्यभरात तपासणी केलेल्या एकूण पंपांची संख्या आता ७२ झाली आहे.
ग्राहकांना कमी पेट्रोल देणाऱ्या पंपांविरुद्ध ठाणे पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील उद्धव येरमेच्या अभिजित फिलिंग सेंटरच्या चार डिस्पेन्सिंग युनिटमधील १० नोझल्सची तपासणी पोलिसांच्या पथकाने केली. त्यापैकी एका नोझलमधून प्रतिपाच लीटरमागे ३३.५ मिलिलीटर पेट्रोल कमी दिल्याचे निदर्शनास आले. गिलबार्को कंपनीचे एक पल्सरकार्ड पोलिसांनी जप्त केले.
पुण्यातील चाकणच्या वैभव शाह यांच्या वैभव पेट्रोल सर्व्हिस स्टेशनच्या एका नोझलमधून प्रतिपाच लीटरला ३४ मिलिलीटर पेट्रोल कमी दिले जात होते. याशिवाय, आणखी दोन युनिटचे इंधन वितरण संशयास्पद आढळले. या पेट्रोलपंपांवरून १० पल्सरकार्ड, १० की-बोर्ड आणि चार कंट्रोलकार्ड जप्त करण्यात आले. वरोरा येथील दुष्यंत देशपांडे यांच्या पद्मालया पेट्रोलियम सर्व्हो पेट्रोलपंपावर प्रतिपाच लीटर ४० ते ७० मिलिलीटर पेट्रोल कमी दिले जात होते. या पंपावरून १८ पल्सरकार्ड, १४ की-पॅड, चार मदरबोर्ड, एक कॅलिब्रेशन बोर्ड आणि दोन कंट्रोलकार्ड जप्त करण्यात आले. चौथी कारवाई जळगावमधील जिल्हा पेठ येथील वंदना महाजन यांच्या अमल आॅटो पेट्रोलपंपावर करण्यात आली. प्रतिपाच लीटरमागे ४० मिलिलीटर पेट्रोल कमी देणाऱ्या या पंपावरून एक पल्सरकार्ड, कंट्रोलकार्ड आणि की-पॅड जप्त करण्यात आले.
या कारवाईनंतर सर्व प्रकरणांमध्ये आतापर्यंत १९ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
चार पंपांची तपासणी
ठाणे पोलिसांनी दोन आठवड्यांपासून सुरू केलेल्या कारवाईअंतर्गत सोमवारी यवतमाळ, पुणे, चंद्रपूर आणि जळगाव या जिल्ह्यांतील चार पंपांची तपासणी केली. तेथेही कारवाई करण्यात आली.