शहरसौंदर्य वाढवण्यासाठी ठामपाचे नवे धोरण, ठामपा आयुक्तांचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 12:22 AM2020-01-07T00:22:12+5:302020-01-07T00:22:18+5:30
ठाणे शहरात किती क्षेत्रामध्ये अन् कोणत्या आकाराचे होर्डिंग लावता येतील, तसेच यामुळे नागरिकांच्या दृष्टीस अडथळा न येता शहरसौंदर्य वाढविणारे तसेच नीटनेटके पदपथ बांधून शहराचे पर्यटनमूल्य वाढेल,
ठाणे : ठाणे शहरात किती क्षेत्रामध्ये अन् कोणत्या आकाराचे होर्डिंग लावता येतील, तसेच यामुळे नागरिकांच्या दृष्टीस अडथळा न येता शहरसौंदर्य वाढविणारे तसेच नीटनेटके पदपथ बांधून शहराचे पर्यटनमूल्य वाढेल, असे ठाणे महापालिकेचे नवे जाहिरात धोरण तयार करण्यात येणार आहे. यासाठी तीन विशेष समित्या स्थापन करण्यात आल्या असून त्यांना अवघ्या एका आठवड्यात आपला मसुदा सादर करण्याचे आदेश सोमवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले.
ठाणे महानगरपालिकेच्या वतीने २००३ च्या शासन जाहिरात धोरणानुसार जाहिरातफलक उभारणीस परवानगी देण्यात येते. यापुढे जाहिरातफलक लावण्यासाठी परवानगी देताना शहराच्या सौंदर्यास बाधा येणार नाही, अशा पद्धतीने परवानगी देणे, किती क्षेत्रफळामध्ये आणि किती आकाराचे होर्डिंग उभे करता येईल, किती अंतरावर त्याची परवानगी देता येईल, याबरोबरच न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करणे, नागरिकांच्या दृष्टीस अडथळा होणार नाही, याची दक्षता घेणे, असे सर्वसमावेशक धोरण तयार करण्यात येणार आहे. यासाठी उपायुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले आणि कार्यकारी अभियंता शहर विकास भेंडाळे यांची समिती नेमण्यात आली आहे.
>सांस्कृतिक अन् कला महोत्सवांना देणार चालना
शहराचे पर्यटनमूल्य वाढावे यासाठी काय करता येईल, याचा अहवाल तयार करण्याचे आदेश देताना शहरामध्ये होणारे सांस्कृतिक तसेच विविध कला महोत्सव, महत्त्वाची ठिकाणे, पार्क आदींबाबत नागरिकांना सहज माहिती मिळावी, यासाठी काय करता येईल, याचाही मसुदा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये उपायुक्त संदीप माळवी, नगर अभियंता रवींद्र खडताळे आणि कार्यकारी अभियंता मोहन कलाल या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
पदपथांचे सौंदर्य वाढविणार
सुलभ पदपथ बनविण्यासाठी आवश्यक धोरण तयार करण्यासाठी अतिरिक्त नगर अभियंता अर्जुन अहिरे यांच्या अधिपत्याखाली रामदास शिंदे आणि विकास ढोले यांची समिती नियुक्त केली आहे. यात पदपथांच्या सौंदर्याबरोबरच ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्यात येणार आहे.