ठामपा स्थायी समितीने फेटाळली पाणीदरवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 02:44 AM2020-03-21T02:44:40+5:302020-03-21T02:45:28+5:30

पालिकेने सादर केलेल्या २०१९-२० चे सुधारित आणि २०२०-२१ चे मूळ अंदाजखर्चास स्थायी समितीने शुक्रवारी मंजुरी दिली.

 Improvement of water rates Rejected by the standing committee | ठामपा स्थायी समितीने फेटाळली पाणीदरवाढ

ठामपा स्थायी समितीने फेटाळली पाणीदरवाढ

Next

ठाणे : ठाणे महापालिकेने सादर केलेल्या २०२०-२१ च्या अंदाजपत्रकात पाणीपुरवठ्याच्या घरगुती, व्यावसायिक वापराच्या नळसंयोजनात ५० ते ६० टक्के दरवाढ प्रस्तावित केली होती; परंतु स्थायी समितीने ती फेटाळली. प्रशासनाने सादर केलेल्या ३,७८० कोटींच्या मूळ अंदाजपत्रकात ३०६ कोटींची वाढ सुचवून ३,०८६ कोटींचे अंदाजपत्रक शुक्रवारी मंजूर केले. आता ते अंतिम मंजुरीसाठी महासभेपुढे जाणार आहे.
पालिकेने सादर केलेल्या २०१९-२० चे सुधारित आणि २०२०-२१ चे मूळ अंदाजखर्चास स्थायी समितीने शुक्रवारी मंजुरी दिली. महासभेला काही महत्त्वाच्या शिफारशीही केल्या आहेत. प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या २०१९-२० चे ३,११० कोटींच्या सुधारित अंदाजपत्रकासही स्थायी समितीने मंजुरी दिली. यात ४९.३० लाखांच्या शिलकेसह १,८४२.११ कोटींचा महसुली खर्च व १,९३७.४० कोटींचा भांडवली खर्च, असे एकूण ३,७८० कोटी रकमेच्या खर्चाचे अंदाजपत्रक स्थायी समितीस प्रशासनाने सादर केले होते. स्थायी समितीने त्यात ३०६ कोटींची वाढ करून ४,०८६ कोटींचे अंदाजपत्रक महासभेच्या मंजुरीसाठी पाठविले आहे. यामध्ये मालमत्ताकर, शहर विकास, जाहिरात, स्थावर मालमत्ता तसेच स्थानिक संस्था कराच्या थकबाकीपोटी वसुली अपेक्षित करून जमेत वाढ केली आहे. मात्र, प्रशासनाने प्रस्तावित केलेली पाणीपट्टीची दरवाढ अमान्य केली आहे.

रविवारी मालमत्ताकर संकलन केंद्र राहणार बंद
२२ मार्च रोजी संपूर्ण देशात संचारबंदी (जनता कर्फ्यू) जाहीर झाल्याने ठाणे महानगरपालिकेची सर्व करसंकलन केंद्रे बंद असणार आहेत. मात्र, आॅनलाइन करसंकलन स्वीकारले जाणार आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षातील मालमत्ताकर वसुलीचे उद्दिष्ट ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्यासाठी तसेच ठामपा क्षेत्रातील मालमत्ताधारक नागरिकांना कर मुदतीत भरता यावा, याकरिता ठाणे महापालिकेची सर्व प्रभाग समिती कार्यालये, उपप्रभाग समिती स्तरावरील सर्व करसंकलन केंद्रे व त्याला संलग्न कार्यालये १ जानेवारी ते ३१ मार्चपर्यंत सुटीच्या दिवशीदेखील सुरू राहणार होती. परंतु, जनता कर्फ्यूच्या अनुषंगाने महानगरपालिकेने त्या दिवशी ही कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title:  Improvement of water rates Rejected by the standing committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.