स्वच्छतेतील गुणांकन सुधारूनही भिवंडीकरांमध्ये मात्र नाराजीचा सूर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 04:26 AM2019-03-18T04:26:59+5:302019-03-18T04:27:22+5:30

स्वच्छ सर्वेक्षण २०१८-१९ मध्ये भिवंडी महापालिकेचा देशात ८४ वा, तर राज्यात २३ वा क्रमांक आला आहे. दोन वर्षांपूर्वी देशात शहराचा क्रमांक ३९२ वा, तर मागील वर्षी ९८ वा क्रमांक होता. स्वच्छतेवर भर दिल्यानेच १४ गुणांची आघाडी मिळाली आहे.

Improving the quality of cleanliness, however, Bhiwandi did not have any answer | स्वच्छतेतील गुणांकन सुधारूनही भिवंडीकरांमध्ये मात्र नाराजीचा सूर

स्वच्छतेतील गुणांकन सुधारूनही भिवंडीकरांमध्ये मात्र नाराजीचा सूर

Next

- पंढरीनाथ कुंभार, भिवंडी

स्वच्छ सर्वेक्षण २०१८-१९ मध्ये भिवंडी महापालिकेचा देशात ८४ वा, तर राज्यात २३ वा क्रमांक आला आहे. दोन वर्षांपूर्वी देशात शहराचा क्रमांक ३९२ वा, तर मागील वर्षी ९८ वा क्रमांक होता. स्वच्छतेवर भर दिल्यानेच १४ गुणांची आघाडी मिळाली आहे. परंतु, महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून केवळ रस्त्यावरील साफसफाई केली जाते. उर्वरित इतर सर्व कामे कंत्राटदारांकडून करवून घेतली जातात. स्वच्छ सर्वेक्षणाच्या निमित्ताने या कंत्राटदारांमध्ये वाढ केली होती. मात्र, तेव्हापेक्षा आता जनजागृतीची मोहीम थंडावली आहे.
मागील सर्वेक्षणात तत्कालीन आयुक्त योगेश म्हसे यांनी शाळेच्या मुलांना संदेश लिहिण्यास प्रवृत्त करून त्यांचा सत्कार केला. त्यामुळे स्वच्छतेचा संदेश आपोआप नवीन पिढीपर्यंत पोहोचला. परंतु, जेथे मुलांनी आकर्षक चित्रे काढली होती, तेथेच यंदा कंत्राटदारांमार्फत रंगरंगोटी करून नवीन चित्रे काढण्यात आली. शहराच्या मुख्य मार्गावर चित्रे काढण्यापेक्षा पालिकेच्या, शाळेच्या व इतर संस्थेच्या भिंतीवर ही चित्रे काढून संदेश दिला असता, तर नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत प्रभावीपणे जागृती झाली असती.
स्वच्छतेची शिस्त लागावी, यासाठी पालिकेने मागील वर्षी कचराडबे नागरिकांना वाटले. मात्र, सध्या अर्धेअधिक डबे गायब झाले आहेत. किती डबे शिल्लक आहेत व त्यांची स्थिती काय, याची माहितीच आरोग्य विभागाला नाही. तर, जेथे डबे आहेत, तेथील कचरा दुपारपर्यंतही उचलला जात नाही. महापालिकेने भित्तीपत्रके लावून, हॅण्डबिले वाटून, ध्वनिक्षेपकावरून नागरिकांना ओला-सुका कचरा वेगळा करण्याचे आवाहन केले. मात्र, वर्गीकरण केलेला कचरा जमा करण्यासाठी घंटागाड्या वा कोणतीच उपाययोजना केली नाही. त्यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांनी कार्यालयांत बसून मिळवलेले गुणांकन भविष्यात घसरण्यास वेळ लागणार नाही, हे तेवढेच खरे.
चालू वर्षात चाविंद्रा येथील डम्पिंगवर दोन व टेमघरमध्ये एक असे तीन बायोगॅस प्रकल्प सुरू करण्याची घोषणा महापालिकेने केली आहे. परंतु, सध्या रामनगर, चाविंद्रा येथे प्रस्तावित असलेल्या डम्पिंग जागा उद्यानासाठी आरक्षित आहे. डम्पिंगला नागरिकांचा विरोध असल्याने अनेकवेळा विविध संघटना व राजकीय पक्षांनी आंदोलने केली आहेत. बायोगॅस प्रकल्प महापालिका राबवणार असली, तरी हा परिसर दाटीवाटीचा आहे. त्यामुळे प्रकल्प राबवल्यास त्याचे दुष्परिणाम नागरिकांना भोगावे लागणार आहेत.
शहरात सुमारे सात लाखांपेक्षा जास्त यंत्रमाग आहेत. त्यातील कचरा हा रस्त्यावर पडलेला असतो अथवा गटारे, नाल्यातून वाहतो. त्यामुळे गटारे तुंबून त्यातील पाणी रस्त्यावरून वाहते. परंतु, घंटागाड्या यंत्रमाग कारखान्यांमधील कचरा गोळा करत नाहीत. त्यामुळे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपली पाठ थोपटताना आपण शहरातील नागरिकांना खरोखर न्याय दिला आहे काय, याचे चिंतन करावे.
शहरातील गटारे, नाले, कचराकुंड्यांची सफाई नियमित होत नाही. लाखो रुपये खर्चून खरेदी केलेली कीटकनाशके, जंतुनाशके व पावडरची फवारणी नियमितपणे केली जात नाही. त्यामुळे या जंतुनाशकांचे काय होते, हा प्रश्न नेहमीच पडतो.

शहराला फायदा झाला का?
शहरात भुयारी गटाराच्या दुसºया टप्प्याचे काम सुरू आहे. मात्र, पहिल्या टप्प्यातील योजनेचा नागरिक तसेच शहराला फायदा झाला का, हेच समजू शकलेले नाही. त्यामुळे योजना यशस्वी झाली का, याचा निष्कर्ष काढता आलेला नाही. त्यामुळे हे काम नागरी हितासाठी की कंत्राटदारांसाठी, असा सवाल केला जात आहे.
पण सुविधाच पोहोचत नाही
शहरातील समस्या नागरिकांच्या सहकार्याशिवाय सुटणार नाहीत. त्यासाठी योग्य जनजागृती केली, तर ते सहकार्यही करतील. परंतु, त्यांच्यापर्यंत सुविधा पोहोचत नाहीत. त्यामुळे संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी कमी पडत आहेत, हे स्पष्ट होते.

च्गतिमान स्वच्छतेकडे जाणारे शहर म्हणून भिवंडी महापालिकेला केंद्राकडून मागील वर्षी बक्षीस मिळाले.
च्महापालिका प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करून शहराचे रूपडे प्रथम पालटण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
च्परंतु, नियमित स्वच्छता राहावी, यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न होत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. तसेच या विभागातील भ्रष्टाचारही बाहेर येत आहे.

Web Title: Improving the quality of cleanliness, however, Bhiwandi did not have any answer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे