भाईंदरमध्ये शिवसैनिकांनी फिरवली बंडखोरांकडे पाठ, शिवसेनेच्या बैठकीला केली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2022 01:05 PM2022-06-27T13:05:53+5:302022-06-27T13:06:16+5:30
दुसरीकडे सृष्टी परिसरात माजी जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे यांच्या कार्यालयाजवळ बोलावलेल्या शिवसेनेच्या बैठकीस उपनेते विनोद घोसाळकर मार्गदर्शन करण्यास आले होते.
मीरा रोड : आमदार प्रताप सरनाईक यांनी एकनाथ शिंदेंसोबत केलेल्या बंडखोरीनंतर येथील नगरसेवक, शिवसैनिकांनी बंडखोरांकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
मीरा-भाईंदर शिवसेनेची गेली १५ वर्षे जबाबदारी असलेले आमदार सरनाईक बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाल्याने मीरा-भाईंदर सेनेला मोठा धक्का बसण्याची चर्चा होती. परंतु शनिवारी पूर्वेश सरनाईक यांनी आ. सरनाईक यांच्या मीरा रोड स्थित मंगल नगर कार्यालयात बोलावलेल्या बैठकीत नगरसेवक राजू भोईर, अनंत शिर्के, नगरसेविका संध्या पाटील, स्वीकृत सदस्य विक्रमप्रताप सिंह आदी उपस्थित होते. सुरुवातीला तर बऱ्याच खुर्च्या रिकाम्या होत्या.
दुसरीकडे सृष्टी परिसरात माजी जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे यांच्या कार्यालयाजवळ बोलावलेल्या शिवसेनेच्या बैठकीस उपनेते विनोद घोसाळकर मार्गदर्शन करण्यास आले होते. यावेळी गटनेत्या नीलम ढवण, नगरसेवक प्रवीण पाटील, कमलेश भोईर, दिनेश नलावडे, जयंतीलाल पाटील, नगरसेविका शर्मिला बगाजी, भावना भोईर, हेलन गोविंद, अर्चना कदम, स्नेहा पांडेसह शंकर वीरकर, प्रशांत पालांडे, सुप्रिया घोसाळकर, लक्ष्मण जंगम, संदीप पाटील, जयराम मेसे, शैलेश पांडे, स्नेहल सावंत आदी उपस्थित होते. नगरसेविका कुसुम गुप्ता यांचे पती संतोष, नगरसेविका तारा घरत यांचा मुलगा पवनसुद्धा शिवसेनेच्या सभेत होते.
बैठकीला जाणे टाळल्याची चर्चा
नगरसेविका भावना भोईर सेनेसोबत तर पती राजू हे बंडखोर गटात उपस्थित होते. नगरसेविका वंदना पाटील यांचा मुलगा विराज सेनेसोबत तर वडील विकास हे बंडखोर गटात दिसले. तर विरोधी पक्षनेते धनेश पाटीलसह नगरसेविका वंदना पाटील, कुसुम गुप्ता आदी काहींनी दोन्ही ठिकाणी बैठकीला जाणे टाळल्याची चर्चा आहे.