भिवंडीत २४ सदनिका परस्पर इतरांच्या नावे करून फसवणूक करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल
By नितीन पंडित | Published: February 1, 2024 05:36 PM2024-02-01T17:36:38+5:302024-02-01T17:36:58+5:30
भिवंडी : महानगरपालिका क्षेत्रात एका इमारतीला मालमत्ता क्रमांक अस्तित्वात असताना फसवणूक करण्याच्या इराद्याने पालिकेतून नवीन मालमत्ता क्रमांक घेऊन तब्बल ...
भिवंडी : महानगरपालिका क्षेत्रात एका इमारतीला मालमत्ता क्रमांक अस्तित्वात असताना फसवणूक करण्याच्या इराद्याने पालिकेतून नवीन मालमत्ता क्रमांक घेऊन तब्बल २४ सदनिका परस्पर इतरांच्या नावे करून विकासकाची फसवणूक केल्याचा प्रकार भिवंडी शहरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी बुधवारी शांतीनगर पोलीस ठाण्यात फसवणूक करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील मौजे नागाव २ येथील सर्व्हे नं. ७७/५ भुखंड क्र. ४, ५, ६ ही जमीन विकासक आसिफ मंजुर शेख यांनी जमीनिचे मुळ मालक सादीक मोहम्मद मेहमुद अन्सारी व इतर यांच्याकडुन मिळकत विकसीत करण्यास घेतली होती.करारात ठरल्याप्रमाणे दोन इमारतींचे काम पूर्ण करून इमारत क्र.१ यास पालिकेकडून मालमत्ता क्रमांक १७६४ नागांव-२ असा प्राप्त झाला होता.हा मालमत्ता क्रमांक अस्तित्वात असताना नजमाबानो अहमदअली अन्सारी यांनी भिवंडी पालिकेकडे नव्याने अर्ज करून बनावट कागदपत्रांच्या आधारे मालमत्ता क्र.३३०७ नागांव-२ असा करून विकासकाच्या वाटयास आलेल्या व विक्री केलेल्या २४ सदनिका स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी नजमाबानो अहमदअली अन्सारी व इतर यांनी स्वतःच्या नावे करून विकासक आसिफ मंजुर शेख व त्यांनी विक्री केलेल्या सदनिकाधारकांची फसवणूक केली.या बाबत आसिफ शेख यांनी शांतीनगर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता.या अर्जाची शहानिशा करून अखेर पोलिसांनी नजमाबानो अहमदअली अन्सारी व इतर यांच्या विरोधात फसवणुकीने २४ सदनिका आपल्या नावे करून फसवणुक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस निरीक्षक विक्रम मोहिते हे करीत आहेत .या संपूर्ण फसवणुकीत पालिका मालमत्ता कर आकारणी विभागातील काही कर्मचारी सुध्दा सहभागी असण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने पालिका कर्मचारी वर्तुळात खळबळ माजली आहे .