भिवंडीत किरीट सोमय्यांविरोधात जोडे मारो आंदोलन, शिवसैनिकांनी व्यक्त केला संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 09:56 PM2022-04-07T21:56:22+5:302022-04-07T21:56:29+5:30
किरीट सोमय्या यांच्यावर युद्धनौका विक्रांतचे स्मारक बनविण्यासाठी सर्वसामान्य जनतेकडून ५७ ते ५८ कोटी रुपये घेल्याचा आरोप.
भिवंडी : भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी युद्धनौका विक्रांतचे स्मारक बनविण्यासाठी सर्वसामान्य जनतेकडून रेल्वे स्टेशन बाहेर डब्बे वाजवून जमा केलेले सुमारे ५७ ते ५८ कोटी रुपये राज्यभवनात जमा केले नसल्याचा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्याबाबत ईडी सीबीआयकडे तक्रार करुनही कारवाई केली जात नाही आणि दुष्ट हेतूने संजय राऊत यांच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई केली जाते असे म्हणत शिवसेना भिवंडी शहरप्रमुख सुभाष माने व भिवंडी ग्रामीण संपर्क संघटक कुंदन पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी किरीट सोमय्या यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.
स्व धर्मवीर आनंद दोघे चौक येथून उपविभागीय अधिकारी कार्यालय येथ पर्यंत शहरप्रमुख सुभाष माने , तालुका ग्रामीण संपर्क प्रमुख कुंदन पाटील यांच्या नेतृत्वखाली निघालेल्या निषेध मोर्चात महानगरप्रमुख शाम पाटील, आदिवासी प्रकल्प समिती अध्यक्षा आशाताई मोरे, नगरसेवक अशोक भोसले ,शहर सचिव महेंद्र कुंभारे ,तालुका सचिव जय भगत,मनोज गगे, मदन भोई, दिलीप नाईक, गोपीनाथ काटेकर, संजय काबुकर,महिला शहर संघटक वैशाली मेस्त्री, महिला तालुका संघटक फशीताई नामदेव पाटील ,पंचायत समिती उपसभापती शिला राखाडे यांसह अनेक शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन केले . तर महिला शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्या फोटोला जोडे मारून आपला संताप व्यक्त केला .त्यानंतर आपले निवेदन प्रांताधिकारी कार्यालयात दिले .