भिवंडीत वेठबिगार मजूर शासकीय दाखल्यांपासून वंचित; तहसीलदार कार्यालयाबाहेर आंदोलन
By नितीन पंडित | Published: July 1, 2024 07:35 PM2024-07-01T19:35:26+5:302024-07-01T19:45:37+5:30
आंदोलनकर्त्या महिलेने हाती राजदंड घेऊन होत असलेल्या अन्यायाविरोधात व्यक्त केला निषेध
नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: वीटभट्टी वर तुटपुंज्या मजुरीवर वर्षोंनवर्षे राबवून घेतल्या जाणाऱ्या आदिवासी वेठबिगार यांच्या मुक्ती नंतर त्यांना शासकीय दाखले व प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येत असल्याने चाळीस वर्षांपूर्वी श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून वेठबिगार मुक्त झालेल्या ताईबाई गायकर या महिलेने भिवंडी तहसीलदार कार्यालया बाहेर हाती राजदंड धरून या घटनेचा निषेध केला असून जोपर्यंत दाखला मिळत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही असा निर्धार व्यक्त केला आहे.
श्रमजीवी संघटनेच्या प्रयत्नातून सुनील भोये वय १८ वर्ष या वेठबिगार मजुरास भिवंडी तालुक्यातून मुक्त करण्यात आले होते.त्यास सहा महिने उलटून गेले तरी सुध्दा सुनील भोये यास आधारकार्ड बनवून देण्यात आला नाही.ज्यामुळे त्याचे बँक खाते उघडण्यास अडचण येत असल्याने वेठबिगार मुक्ती पुनर्वसन निधीचा लाभ मिळण्यात पासून तो वंचित राहिला आहे.
वेठबिगार मुक्ती नंतर हाताला काम नसल्याने व शासकीय दाखले मिळत नसल्याने सुनील भोये यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.सुनील भोये यास न्याय मिळवून देण्यासाठी ४० वर्षां पूर्वी वेठबिगार मुक्त झालेल्या ताईबाई गायकर यांनी पुढाकार घेतला आहे.त्यांनी सोमवारी भिवंडी तहसीलदार कार्यालय गाठत तहसीलदार अभिजित खोले हे कार्यालयात नसल्याने कार्यालया बाहेर हाती राजदंड धरून आंदोलन केले.सुनील भोये यास न्याय मिळे पर्यंत हे आंदोलन सुरू राहील अशी भावना ताईबाई गायकर यांनी बोलून दाखवली आहे.
वेठबिगार मुक्ती नंतर संबंधित मुक्त झालेल्या मजुरास तात्काळ बंध मुक्तीचा दाखल दिला जातो. सुनील भोये यांना जॉब कार्ड सुध्दा बनवून देण्यात आले आहे.परंतु वास्तव्याचा पुरावा नसल्याने आधारा कार्ड बनविण्यात अडचण येत आहे. त्याबाबत तात्काळ कार्यवाही केली जाईल अशी प्रतिक्रिया निवासी तहसीलदार विशाल इंदुलकर यांनी दिली आहे.