भिवंडीत वंचितच्या उमेदवारास उमेदवारी अर्ज भरण्यापासून ठेवले वंचित, तोतयावर गुन्हा दाखल
By नितीन पंडित | Published: May 4, 2024 10:44 PM2024-05-04T22:44:41+5:302024-05-04T22:44:55+5:30
या प्रकरणी भिवंडी शहर पोलिस ठाण्यात एका तोतया विरोधात शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिवंडी: भिवंडी लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघालेल्या उमेदवाराचे एबी फॉर्म,
पॅनकार्ड,आधारकार्ड अशी महत्वाची कागदपत्र आपल्या ताब्यात ठेऊन त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्या पासून वंचित ठेवल्या प्रकरणी भिवंडी शहर पोलिस ठाण्यात एका तोतया विरोधात शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याण येथे राहणारे सेवानिवृत्त मिलिंद देवराम कांबळे हे वंचित बहुजन आघाडी पक्षा कडून भिवंडी लोकसभेत उमेदवारी अर्ज दाखल करणार होते. त्यासाठी त्यांनी फॉर्म भरण्याची जबाबदारी उल्हासनगर येथील मिलिंद काशिनाथ कांबळे याच्याकडे दिली होती. अधिकृत उमेदवार असलेले मिलिंद देवराम कांबळे यांच्या कडील पक्षाचे एबी फॉर्म व इतर महत्वाची मुळ कागदपत्रे आपल्या ताब्यात घेऊन केवळ नामसाधर्म्य असल्याचा फायदा घेत मिलिंद देवराम कांबळे यांचा अर्ज प्रक्रिया पूर्ण न करता मिलिंद काशिनाथ कांबळे या नावाने वंचित बहुजन आघाडीचा उमेदवारी अर्ज दाखल करून उमेदवारी अर्ज भरण्यापासुन मिलिंद देवराम कांबळे यांना वंचित ठेवुन त्यांची फसवणुक केली.याप्रकरणी भिवंडी शहर पोलिस ठाण्यात भामटा मिलिंद काशिनाथ कांबळे याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिवंडी लोकसभा क्षेत्रात वंचित बहुजन आघाडी पक्षाने जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे यांना पाठिंबा जाहीर केला होता.परंतु ३० एप्रिल रोजी निलेश सांबरे यांनी अपक्ष व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने नाराज झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ही बाब पक्ष श्रेष्ठींच्या निदर्शनास आणून दिल्याने पक्षाने मिलिंद देवराम कांबळे यांच्या साठी अधिकृत उमेदवारीसाठी ए बी फॉर्म दिला होता अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे उल्हासनगर शहराध्यक्ष उज्वल महाले यांनी दिली आहे.