भिवंडीत भूमी अभिलेख विभागातर्फे जमिनीची सनद वाटप कार्यक्रम संपन्न
By नितीन पंडित | Published: January 25, 2023 05:47 PM2023-01-25T17:47:53+5:302023-01-25T17:48:55+5:30
भिवंडी - भूमी अभिलेख विभाग,सर्व्हे ऑफ इंडिया व ग्रामविकास विभाग यांचे संयुक्त विद्यमाने गावठाण जमिनीचे जियोग्राफीकल इन्फॉर्मेशन सिस्टीम प्रणाली ...
भिवंडी - भूमी अभिलेख विभाग,सर्व्हे ऑफ इंडिया व ग्रामविकास विभाग यांचे संयुक्त विद्यमाने गावठाण जमिनीचे जियोग्राफीकल इन्फॉर्मेशन सिस्टीम प्रणाली आधारीत सर्वेक्षण व भूमापन केलेल्या मिळकतीचा सनद वाटप कार्यक्रम तालुक्यातील एलकुंदे येथे मंगळवारी पार पडला.राज्यभर सुरु करण्यात आलेल्या या कार्यक्रमाची प्राथमिक सुरुवात या कार्यक्रमातून करण्यात आली आहे. या कार्यक्रमाप्रसंगी केंद्र शासनाच्या पंचायती राज मंत्रालयातील सहसचिव ए.पी.नागर ,महाराष्ट्राचे जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख एन.के.सुधांशु यांच्यासह कोकण भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक जयंत निकम,जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षकट बाबासाहेब रेडेकर,फतेहपुर येथील सर्व्हे ऑफ इंडियाचे कर्नल सुनिल फतेहपुर,तहासिलदार अधिक पाटील,गटविकास अधिकारी डॉ प्रदीप घोरपडे,भिवंडी भूमि अभिलेख विभागाचे उप अधीक्षक प्रमोद जरग यांसह पंचक्रोशीतील सरपंच, ग्रामसेवक, शेतकरी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शासनाने स्वामित्व योजने अंतर्गत भूसंदर्भीकरण प्रक्रिया संदर्भात जियोग्राफीकल इन्फॉर्मेशन सिस्टीम जीआयएस प्रणाली द्वारे गावठाण जमिनीचे द्रोण द्वारे सर्वेक्षण करून त्याद्वारे मिळणारे चित्र अक्षांश रेषांश निहाय मिळकत निश्चित केली जात आहे.त्याद्वारे जमिनीचा मालकी हक्कांचा पुरावा सनद स्वरूपात बनविण्यात आले असून संबंधित मिळकतदारांना सनद पत्रांचे वितरण यावेळी करण्यात आले.
यावेळी प्रत्यक्ष जागेवर वापर करुन ड्रोन प्रारूप नकाशा अद्यावत करणे आणि प्रत्येक मिळकतीची माहिती शासनाच्या भूमी अभिलेख यंत्रणेशी संलग्न करणे याबाबतचा प्रात्यक्षिक पाहणी दौरा अस्नोली तर्फे कुंदे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भिवंडी भूमि अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक प्रमोद जरग यांच्या नेतृत्वाखाली कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.