भिवंडीत चोरीच्या घटनेतील सराईत गुन्हेगाराला अटक, गुन्हे शाखेची कारवाई; ११ गुन्ह्यातील साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
By नितीन पंडित | Published: January 5, 2024 07:44 PM2024-01-05T19:44:33+5:302024-01-05T19:44:55+5:30
अक्षय दीपक वर्मा उर्फ शिवा वय २७ वर्ष रा. हनुमान टेकडी भिवंडी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
भिवंडी: शहरात दुचाकी चोरीसह मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असताना गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत एका सराईत गुन्हेगारास अटक करून ११ गुन्ह्याचा उलगडा केला असून अटक आरोपीकडून साडेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात गुन्हे शाखेला यश आले असल्याची माहिती भिवंडी गुन्हे शाखेने शुक्रवारी दिली आहे. अक्षय दीपक वर्मा उर्फ शिवा वय २७ वर्ष रा. हनुमान टेकडी भिवंडी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
त्याच्यावर भिवंडीतील विविध पोलीस ठाण्यांसह, कल्याण, मुंबई परिसरातील पोलीस ठाण्यांमध्ये १४ गुन्ह्यांची नोंद आहे. ३१ डिसेंबर रोजी गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत अक्षय वर्मा यास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून ११ गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला असून सुमारे ४ लाख ५० हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ज्यात ५ मोटरसायकल व ७ मोबाईल यांचा समावेश आहे. सदरची कारवाई भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार, पोलीस हवालदार मंगेश शिर्के, अमोल देसाई, पोलीस शिपाई अमोल इंगळे यांच्या विशेष पथकाने केली आहे.