भिवंडीत वाहतूक पोलिसांच्या टोईंग व्हॅनचा दुचाकी चालकांना नाहक त्रास
By नितीन पंडित | Published: January 19, 2023 04:54 PM2023-01-19T16:54:40+5:302023-01-19T16:56:32+5:30
भिवंडी - भिवंडीत वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली असून वाहतूक विभागाकडून या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होण्यासाठी योग्य ते ...
भिवंडी - भिवंडीत वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली असून वाहतूक विभागाकडून या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होण्यासाठी योग्य ते प्रयत्न होताना दिसत नाहीत,उलट वाहतूक पोलिसांच्या शहरात फिरत असलेल्या टोइंग व्हॅनचा दुचाकी वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
ज्या ठिकाणी वाहतूक कोंडीची कोणतीही समस्या निर्माण होणार नाही अशा अडगळीच्या ठिकाणी उभी केलेली दुचाकी वाहने देखील हे टोइंग व्हॅन वाले उचलून नेत आहेत. विशेष म्हणजे हे वाहन उचलताना डोईंग व्हॅनवर काम करणारे खाजगी कंत्राटी कामगारांकडून वाहन चालकांना अरेरावी करण्यात येत आहे.विशेष म्हणजे या टोईंग व्हॅन मध्ये एक वाहतूक पोलीस कर्मचारी बसलेला असल्याने वाहन चालक पोलिसांना पाबुं घाबरत असल्याने या टोईंग व्हॅनवरील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची अरेरावी शहरात वाढली आहे.
विशेष म्हणजे मेडिकल,झेरॉक्स अथवा किराणा दुकानातून एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी तात्पुरत्या कारणासाठी उभी केलेली दुचाकी देखील हे टोईंग व्हॅनवाले उचलून नेट असून या टोईंग व्हॅनच्या मागे वाहन चालक धावल्यानंतरही हि गाडी थेट कल्याण नाका येथे साखळी लावून अडवून धरतात.कल्याण नाका वाहतूक शाखेजवळ वाहतूक पोलीस मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने अनेक वेळा शहरातील कामगार व गरीब वाहन चालक पोलिसांना घाबरत असल्याने विनंत्या करूनही हे टोईंग व्हॅनचालक दुचाकी सोडून देत नाहीत.
विशेष म्हणजे भिवंडीत टोईंग व्हॅन व त्यावरील कर्मचाऱ्यांचा ठेका एका खासगी राजकीय व्यक्तीने घेतला असून वाहतूक पोलीस अशा राजकीय व्यक्तीच्या दावणीला बांधले असल्याचे चित्र सध्या शहरात पाहायला मिळत असून एकिकडे वाहतूक पोलिसांकडून राज्यभरात वाहतूक सप्ताहच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे मात्र दुसरीकडे भिवंडीसारख्या शहरात टोईंग व्हॅनवाले खासगी कंत्राटदार वाहतूक पोलिसांच्या जनजागृतीला स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हरताळ फासत असून भिवंडी वाहतूक पोलीस विभागाचे कोणतेही नियंत्रण राहिले नसल्याने या बेकायदेशीर काम करून वाहन चालकांना नाहक त्रास देणाऱ्या टोईंग व्हॅन कंत्राटदारांवर कारवाई करावी अशी मागणी शहारवासीयांकडून करण्यात येत आहे.