पडद्याचा आडोसा करत आवारातच महिलेची प्रसूती; भिवंडी उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार
By नितीन पंडित | Published: February 13, 2023 07:55 PM2023-02-13T19:55:35+5:302023-02-13T19:56:10+5:30
भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात पडद्याचा आडोसा करत आवारातच महिलेची प्रसूती झाली.
भिवंडी : भिवंडीतील स्व.इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रूग्णालयात प्रसूतीसाठी दाखल महिलेची रुग्णालय कर्मचाऱ्यांनी वेळीच दखल घेत प्रसूती न केल्याने वेदनेने कळवळणाऱ्या महिलेने रुग्णालय परिसरात उघड्यावर महिलांनी केलेल्या पडद्याच्या आडोशा मध्ये प्रसूत होण्याची वेळ आली.या घटनेनंतर उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला आहे.
शांतीनगर भागात राहणारा अफसर शेख शुक्रवारी सायंकाळी सात वाजता आपल्या गर्भवती पत्नीला प्रसूतीसाठी उपजिल्हा शासकीय रुग्णालयात घेऊन आला होता.परंतु महिलेची प्रकृती बिकट असल्याने प्रसूती वॉर्डातील डॉक्टरांसह रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी महिलेला प्रसुतीसाठी दाखल करण्यास नकार दिल्याचे महिलेच्या पतीने सांगितले. त्यानंतरही चार तास रुग्णालय कर्मचाऱ्यांकडे विनवण्या करूनही महिलेला रूग्णालयात दाखल करण्यात आले नव्हते.त्यानंतर रुग्णलयाच्या आवारातील जमिनीवर प्रसूती वेदना सहन न झाल्याने त्या महिलेने रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास रूग्णालयाच्या आवारातच एका बाळाला जन्म दिला.त्यावेळी उपस्थित महिलांनी एकत्र येऊन महिलेची पडद्याआड प्रसूती केली.प्रसूतीदरम्यान महिलेला अतिरक्तस्त्राव झाल्या नंतर रुग्णालयाच्या प्रसूती विभागातील कर्मचाऱ्यांनी आपली चूक झाकण्यासाठी महिलेला रुग्णालयात दाखल करून घेतले.'
डॉक्टर आणि नर्सच्या निष्काळजीपणा मुळे प्रसूती दरम्यान जास्त रक्तस्त्राव झाल्याने पत्नी बेशुद्ध झाली.त्यानंतर तिची प्रकृती खालावल्याने तिला उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आले आहे अशी माहिती देत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी महिलेचा पती अफसर शेख याने केली आहे.या बाबत रुग्णालय अधीक्षक वैद्यकीय अधिकारी डॉ राजेश मोरे यांच्याशी संपर्क साधला असता सदर महिला रुग्णालयात दाखल केली होती.तिची तपासणी केली असता तिचा हिमोग्लोबिन चार व पांढऱ्या पेशींचे प्रमाण कमी असल्याने महिलेची या रुग्णालयात प्रसूती करणे धोकादायक ठरू शकत होते.
म्हणून सदर महिलेला ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी जाण्याचा सल्ला दिला होता.त्यामुळे महिलेच्या पतीने रुग्णालयात आरडाओरड करीत गोंधळ घातला. त्यामुळे त्याच्या नंतर त्याची पत्नी ही तेथून त्याच्या मागे निघाली प्रसूती कक्षातील कर्मचारी महिलांनी तिला रोखण्याचा प्रयत्न केला पण त्यास तिने जुमानले नाही.त्यानंतर ही महिला रुग्णालया बाहेर प्रसूत झाली अशी माहिती डॉ राजेश मोरे यांनी दिली आहे .