भाजपच्या ठाणे जिल्हा यादीत प्रस्थापितांवरच पसंतीची मोहोर! तर्कवितर्कांना पूर्णविराम, उमेदवारी जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 06:31 AM2024-10-21T06:31:40+5:302024-10-21T06:32:32+5:30
विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना कल्याण पूर्व मतदारसंघातून दिली उमेदवारी
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना कल्याण पूर्व मतदारसंघातून, तर किसन कथोरे यांना पुन्हा मुरबाडमधून उमेदवारी देऊन भाजपने तर्कवितर्काना पूर्णविराम दिला. गणपत गायकवाड यांनी शिंदेसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याने महायुतीमधील वाद उघड झाले होते, तर भिवंडी लोकसभेतील कपिल पाटील यांच्या पराभवानंतर कथोरे यांची उमेदवारी कापण्यासाठी पाटील यांनी पूर्ण ताकद लावली होती, असे म्हटले जाते.
भाजपच्या ९९ जागांच्या यादीत ठाणे जिल्ह्यातील भिवंडी पश्चिम, मुरबाड, कल्याण पूर्व, डोंबिवली, ठाणे, मुरबाड, कल्याण पूर्व, डोंबिवली, ठाणे, ऐरोली व बेलापूर या मतदारसंघांचा समावेश आहे. मात्र, उल्हासनगर, मीरा- भाईंदर या मतदारसंघांतील उमेदवार भाजपने जाहीर केलेले नाहीत. मातब्बर मंत्री रवींद्र चव्हाण यांचे नाव अपेक्षेनुसार पहिल्या यादीत आहे.
भिवंडी पश्चिममधून विद्यमान आमदार महेश चौगुले यांना त्याचप्रमाणे ठाणे मतदारसंघातून सातत्याने विजयी होणारे आमदार संजय केळकर यांना आणि ऐरोली व बेलापूरमधून अनुक्रमे गणेश नाईक व मंदा मात्रे यांना उमेदवारी दिली. कल्याण पूर्व येथील जमिनीच्या वादावरून गणपत गायकवाड यांनी शिंदेसेनेच्या महेश यांच्यावर गोळीबार केल्यामुळे यावेळी त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी मिळणार का? याबद्दल तर्कवितर्क लढविले जात होते. मात्र, सुलभा यांची पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर करून भाजपने गणपत गायकवाड यांची पाठराखण केली.
कथोरेंकडून पाटील यांना मात?
भिवंडी लोकसभा मतदारसंघात कपिल पाटील यांचा पराभव झाला. आपल्या पराभवास कथोरे कारणीभूत असून, विधानसभा निवडणुकीत त्यांचा "करेक्ट कार्यक्रम करणार", अशी राणा भीमदेवी थाटाची घोषणा पाटील यांनी केली होती. मात्र, कथोरे पुन्हा तिकीट घेऊन आले त्यामुळे त्यांनी पाटील यांच्यावर मात केली.
मीरा-भाईंदरबद्दल उत्सुकता
- मीरा-भाईंदरमध्ये मागच्या वेळी भाजपच्या नरेंद्र मेहता यांचा पराभव करून अपक्ष गीता जैन विजयी झाल्या. त्यानंतर त्यांनी भाजपचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले. मीरा-भाईंदरची जागासुद्धा पक्षाने जाहीर केलेली नाही. त्यामुळे तेथे गीता जैन यांनाच उमेदवारी मिळणार की, नरेंद्र मेहता गीता जैन यांचे तिकीट कापण्यात यशस्वी होणार, याची उत्सुकता कायम आहे.
पुन्हा संजय केळकरच!
ठाणे मतदारसंघातून यावेळी संजय केळकर यांच्याऐवजी तुलनेने तरुण चेहरा दिला जाईल, अशी चर्चा सुरू होती. केळकर यांनाच पुन्हा संधी दिली. उल्हासनगरातील विद्यमान आमदार कुमार आयलानी यांची उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यामुळे येथे उमेदवार बदलला जाणार असल्याच्या चर्चेला बळ प्राप्त झाले. मला दिलेली उमेदवारी हा बहिणीचा सन्मान आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांचे आभार मानते.
- सुलभा गायकवाड, भाजप