उल्हासनगरात मालमत्ता कराचा भरणा न केल्यास, मालमत्ता होणार जप्त
By सदानंद नाईक | Published: February 7, 2023 05:05 PM2023-02-07T17:05:13+5:302023-02-07T17:05:45+5:30
उल्हासनगर महापालिका मालमत्ता कराची वसुली होण्यासाठी दिवाळी सणा दरम्यान आयुक्त अजीज शेख यांनी अभय योजना लागू केली. मात्र नागरिकांनी अभय योजनेला प्रतिसाद दिला नाही.
उल्हासनगर : महापालिकेचे मुख्य उत्पन्नाचे स्त्रोत असलेल्या मालमत्ता कराची वसुली गेल्या १० महिन्यात फक्त ३५ कोटी झाली. दरम्यान आयुक्त अजीज शेख यांनी नागरिकांना मालमत्ता कर भरण्याचे आवाहन करून थकबाकीधारकांच्या मालमत्तेच्या जप्तीचे संकेत दिले. तसेच २ महिन्यात १०० कोटी वसुलीचे टार्गेट मालमत्ता विभागाला दिले आहे.
उल्हासनगर महापालिका मालमत्ता कराची वसुली होण्यासाठी दिवाळी सणा दरम्यान आयुक्त अजीज शेख यांनी अभय योजना लागू केली. मात्र नागरिकांनी अभय योजनेला प्रतिसाद दिला नाही. जानेवारी महिन्या अखेर पर्यन्त मालमत्ता कर विभागाकडून फक्त ३५ कोटींची वसुली झाल्यावर, आयुक्त अजीज शेख यांनी आक्रमक भूमिका घेतली. विभागाची ५५० कोटी पेक्षा जास्त एकून थकबाकी असून चालू मालमत्ता कर बिल ११० कोटीचे असल्याची माहिती आयुक्त अजीज शेख यांनी दिली. तसेच मोठ्या थकबाकीधारकांनी यादी बनविली असून त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत आयुक्तांनी दिले. मालमत्ता कर बिलाच्या वितरणात दिरंगाई झाल्याने, मालमत्ता कर वसुली समाधानकारक झाली नसल्याचे बोलले जाते. तसेच मालमत्ता विभागाच्या वसुलीसाठीं करनिर्धारकाची बदली इतर विभागात करून त्याजागी लिपिक दर्जाच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्याने, करवसुलीवर परिणाम झाला. अशी टीकेची झोळ उठली आहे.
महापालिका मालमत्ता कर विभागाची एकून थकबाकी ५५० कोटी पेक्षा जास्त असून विभागाला येत्या दोन महिन्यात १०० कोटीच्या वसुलीचे टार्गेट आयुक्तांनी दिले. आयुकानी दिलेली १०० कोटीच्या टार्गेटची वसुली होणार का? असा प्रश्न निर्माण झाला. महापालिका आर्थिक डबघाईला आली असून शासन अनुदान आल्यानंतरच कर्मचाऱ्याचा पगार होतो. अश्या परीस्थिती मध्ये मालमत्ता कर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदलीची मागणी सुरू झाली आहे. विभागात ठाण मांडून बसलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची जो पर्यंत आयुक्त उचलबांगडी करणार नाही. तोपर्यंत आयुक्तांनी दिलेल्या १०० कोटीच्या वसुलीचे टार्गेट पूर्ण होणार नसल्याचे बोलले जात आहे.