धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमात दुसऱ्या दिवशीही चोरट्यांचा धुमाकूळ, अनेकांचे दागिने चोरीला
By धीरज परब | Published: March 22, 2023 01:41 PM2023-03-22T13:41:32+5:302023-03-22T13:41:44+5:30
पहिल्या दिवशी तर तब्बल ३६ महिलांच्या गळ्यातील दागिने चोरीला गेले होते.
मीरारोड - बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री यांच्या दर्शनासाठी झालेल्या गर्दीत दुसऱ्या दिवशी देखील चोरट्यांनी धुमाकूळ घालत ८ महिलांच्या गळ्यातील दागिने चोरल. पहिल्या दिवशी तर तब्बल ३६ महिलांच्या गळ्यातील दागिने चोरीला गेले होते.
मीरारोडच्या श्रीकांत जिचकार चौक ( एस के स्टोन चौकी ) जवळील मैदानात बाबा धीरेंद्र शास्त्री यांच्या दर्शनाचा कार्यक्रम भाजपाच्या वतीने शनिवार १८ मार्च व रविवार १९ मार्च असा आयोजित केला होता . शनिवारी पहिल्याच दिवशी बाबांच्या दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी उसळली. गर्दीचा फायदा घेऊन १८ मार्च रोजी ३६ महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या व मंगळसूत्र असे एकूण ४५० ग्राम वजनाचे ४ लाख ८७ हजार किमतीचे दागिने चोरीचा गुन्हा मीरारोड पोलिसांनी दाखल केला होता. पोलिसांनी ६ महिला चोरांच्या टोळीला सुद्धा अटक केली होती.
दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी चोरीचा अनुभव पाहता पोलीस व आयोजक प्रभावी बंदोबस्त आणि व्यवस्था ठेवतील अशी अपेक्षा होती. मात्र रविवारी देखील चोरटयांनी पोलिसांना न घाबरता आपली हात सफाई केली. सोमवारी मीरारोड पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार ८ महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र व सोनसाखळ्या असा एकूण १५० ग्रॅम वजनाचा व १ लाख ४३ हजारांचा ऐवज चोरण्यात आल्याचे नमूद केले आहे. दोन दिवसात बाबांच्या दर्शन कार्यक्रमात आलेल्या एकूण ४४ महिला भाविकांचे दागिने चोरीला गेले आहेत.