सहा महिन्यांसाठी कळवा रुग्णालयात घेतल्या जाणार १०० परिचारीका
By अजित मांडके | Published: November 9, 2023 04:25 PM2023-11-09T16:25:33+5:302023-11-09T16:27:20+5:30
पुढील सहा महिन्यांसाठी तब्बल १०० परिचारीकांची पदे कंत्राटी स्वरुपात भरण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
ठाणे : कळवा हॉस्पीटलमध्ये झालेल्या १८ रुग्णांच्या मृत्यु नंतर येथील मनुष्यबळ वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आॅगस्ट महिन्यात ७२ नर्सची भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. आता पुढील सहा महिन्यांसाठी तब्बल १०० परिचारीकांची पदे कंत्राटी स्वरुपात भरण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. येत्या २२ नोव्हेंबर रोजी त्यासाठी थेट मुलाखत घेतली जाणार आहे.
कळवा रुग्णालयात १२५ शिकाऊ आणि १५० च्या आसपास तज्ञ डॉक्टर आहेत. सध्या कळवा रुग्णालयात २१० नर्सेसची पदे मंजुर आहेत. त्यातील १८० पदे भरली गेली आहेत. त्यानुसार केवळ ३० पदे रिक्त असल्याचे सांगतिले जात आहे. परंतु ऑगस्ट महिन्यात आरोग्य विभागाने ७२ पदे कंत्राटी स्वरुपात भरण्याची केली होती. त्यासाठी राज्यभरातून ४०० हून अधिक उमेदवार थेट मुलाखतीसाठी हजर झाले होते. दरम्यान आता कळवा रुग्णालयावर पुन्हा ताण वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे मनुष्यबळाची कमतरता रुग्णालयाला जाणवू लागली आहे. त्या अनुषंगाने आता परिचारीकांची पदे कंत्राटी स्वरुपात भरण्याचा निर्णय महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यानुसार जातीनिहाय तब्बल १०० पदे भरली जाणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. परंतु ही कंत्राटी पद भरती केवळ सहा महिन्यांसाठी असेल असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.
येत्या २२ नोव्हेंबर २०२३ रोजी यासाठी थेट मुलाखत घेतली जाणार असून उमेदवारांनी महापालिका मुख्यालय पाचपाखाडी येथे मुलाखतीसाठी हजर राहावे असेही पालिकेने स्पष्ट केले. त्यातही कोवीड काळात महापालिकेकडे परिचारीका म्हणून सेवा दिलेल्या उमेदवारांस अधिक प्राधान्य दिले जाईल असेही पालिकेने स्पष्ट केले. त्यातही सकाळी ११ वाजता थेट मुलाखतीचा कार्यक्रम सुरु होणार आहे. त्यानुसार ही पद भरती छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्याल यासाठी असेल असेही पालिकेने स्पष्ट केले.