मीरा भाईंदर शहरात २७ इमारती अतिधोकादायक, २९ इमारती रिकाम्या करून दुरुस्त कराव्या लागणार
By धीरज परब | Published: March 13, 2024 06:02 PM2024-03-13T18:02:02+5:302024-03-13T18:03:36+5:30
पावसाळ्याच्या दरम्यान जुन्या व धोकादायक इमारती पडून वा त्याचा भाग पडून दुर्घटना होत असतात. त्यात जीवितहानीसह मालमत्तेचे नुकसान होत असते.
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने येणाऱ्या पावसाळ्याच्या आधी शहरातील २७ अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. तर २९ इमारती रिकाम्या करून दुरुस्ती करण्यास सांगितले आहे.
पावसाळ्याच्या दरम्यान जुन्या व धोकादायक इमारती पडून वा त्याचा भाग पडून दुर्घटना होत असतात. त्यात जीवितहानीसह मालमत्तेचे नुकसान होत असते. त्यामुळे महापालिका पावसाळ्या आधी शहरातील अतिधोकादायक, धोकादायक आदी स्वरूपाच्या इमारतींची यादी जाहीर करत असते.
यंदा महापालिकेने जाहीर केलेल्या सी १ श्रेणीतील राहण्या योग्य नसलेल्या अतिधोकादायक इमारतींची संख्या २७ इतकी आहे. त्यात प्रभाग समिती १ मध्ये १ ,प्रभाग समिती २ मध्ये ६ इमारती, प्रभाग समिती ३ भाईंदर पूर्व मध्ये ९ इमारती प्रभाग समिती ४ मध्ये ३, प्रभाग समिती ५ मध्ये २ तर प्रभाग समिती ६ मध्ये ६ इमारती अतिधोकादायक अवस्थेत आहेत. त्यातील भाईंदरची आनंद लक्ष्मी ही अति धोकादायक इमारत तोडताना त्याचा काही भाग लगतच्या बैठ्या घरांवर पडून अपघात झाला होता.
या शिवाय सी २ ए श्रेणी म्हणजेच इमारत रिकामी करून दुरुस्ती करण्या योग्य २९ इमारती आहेत. सी २ बी श्रेणी म्हणजेच इमारत रिकामी न करता दुरुस्त करण्या योग्य ४३१ इमारती आहेत . तर सी ३ श्रेणीतील किरकोळ दुरुस्ती करण्या योग्य इमारतींची संख्या ३२ इतकी आहे .
मीरा-भाईंदर महापालिकेने शहरातील धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. यामध्ये ३७ इमारती अत्यंत धोकादायक असल्याचे जाहीर केले आहे. यामध्ये मीरारोडच्या १२ इमारती आणि भाईंदरमधील १५ इमारतींचा समावेश आहे.
गेल्या वर्षी अतिधोकादायक स्थितीतील १६ इमारती पालिकेने जाहीर केल्या होत्या. त्यातील ९ इमारती पाडण्यात आल्या असून ७ इमारतीची प्रकरणे न्यायालयात आहेत. अतिक्रमण विभागाच्या मार्फत तसेच प्रभाग अधिकारी यांच्या मार्फत धोकादायक इमारतीं बाबत कार्यवाही केली जाते.
धोकादायक इमारतीत राहणे जीवघेणे असून देखील अनेक कुटुंब त्यात राहतात तसेच व्यावसायिक आपला व्यवसाय करत असतात. भाईंदर पूर्वेला रेल्वे स्थानक समोर एक बारवाली इमारतीचा भाग कोसळून एकाच मृत्यू झाला होता. त्याला नोटीस बऱ्याच वर्षां पूर्वी देऊन नंतर पालिकेने दुर्लक्ष केले होते.