मीरारोड: नाचगाणे व मौजमजेत प्रशासन दंग; महापालिकेची कार्यालये व नागरिकांना सोडले वाऱ्यावर

By धीरज परब | Published: February 28, 2023 10:17 PM2023-02-28T22:17:37+5:302023-02-28T22:19:03+5:30

मीरा भाईंदर महापालिकेत प्रशासकीय राजवटीच्या मनमानीचा संतापजनक प्रकार नागरिकांना अनुभवायला मिळाला.

in mira road dance and fun with the administration municipal offices and citizens are left in the wind | मीरारोड: नाचगाणे व मौजमजेत प्रशासन दंग; महापालिकेची कार्यालये व नागरिकांना सोडले वाऱ्यावर

मीरारोड: नाचगाणे व मौजमजेत प्रशासन दंग; महापालिकेची कार्यालये व नागरिकांना सोडले वाऱ्यावर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेत प्रशासकीय राजवटीच्या मनमानीचा संतापजनक प्रकार मंगळवारी नागरिकांना अनुभवायला मिळाला . पालिकेचा वर्धापनदिन म्हणून कार्यालयीन वेळेत कामकाज सोडून पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी नटून थटून मौजमजा , नाचगाण्यात मश्गुल होते . तर पालिकेची कार्यालये ओस पडलेली पाहून कामासाठी आलेल्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला . 

मीरा भाईंदर महापालिकेच्या मुख्यालयासह विविध कार्यालयात सकाळ पासून विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांना कार्यालये ओस पडलेली पाहून आश्चर्य वाटले . अगदी जन्म, मृत्यू नोंदणी पासून पाणीपुरवठा विभाग, आरोग्य विभाग , सार्वजनिक बांधकाम विभाग , प्रभाग समिती कार्यालये  आदी आयुक्त , अतिरिक्त आयुक्त , उपायुक्त , विभाग प्रमुख आदी जवळपास सर्वच कार्यालये अधिकारी - कर्मचारी नसल्याने रिकामी होती . सर्वत्र शुकशुकाट होता . 

नागरिक कामासाठी आपला खाडा करून आले होते . दिव्यांग नागरिक सुद्धा चालत येत नसताना मुख्यालयात काम आहे म्हणून आले होते .  मात्र पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयीन वेळ सोडून चक्क पालिकेचा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी मनोरंजनाच्या कार्यक्रमात दंग असल्याचे समजल्यावर मात्र लोकांनि संताप व्यक्त केला . 

महापालिकेचा २८ फेब्रुवारी हा स्थापना दिवस असल्याने मंगळवारी सकाळी पासून काशीमीरा येथील लता मंगेशकर नाट्यगृहात वाद्यवृंद व मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता . तो कार्यक्रम दुपारी उशिरा संपला . त्या कार्यक्रमासाठी पालिकेचे आयुक्त दिलीप ढोले सह सर्व वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी झाडून उपस्थित होते . त्या कार्यक्रमात उपायुक्त सह अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तुफान डान्स केला . काहींनी गाणी म्हटली. सर्वजण धम्माल मस्ती मध्ये मग्न होते . 

मात्र आपल्या व्यथा व समस्या घेऊन आलेल्या सामान्य नागरिकांना मात्र कार्यालयेच रिकामी असल्याने माघारी फिरावे लागले . लोकांचा वेळ आणि पैसा वाया गेला . पालिकेचा वर्धापन दिन साजरा करायचाच होता तर तो सुट्टीच्या दिवशी वा सायंकाळी कामकाजाची वेळ संपल्या नंतर करायचा होता असे लोकांनी बोलून दाखवले . 

गेल्या आठवड्या भरा पासून पालिकेचे विविध कार्यक्रम सुरूच आहेत . त्यामुळे अनेक अधिकारी व कर्मचारी जागेवर सापडत नाहीत . त्यात मंगळवारी तर पालिकेत चिटपाखरू सुद्धा नसल्याने लोक संतप्त आहेत . नागरिकांना वेठीस धरून पालिकेचा वर्धापन दिवस नाचगाण्याने साजरा करण्याचा प्रकार निंदनीय असल्याची टीका लोकांनी केली . 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: in mira road dance and fun with the administration municipal offices and citizens are left in the wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.