पालघरमध्ये महाविकास आघाडीने दिला सत्ताधाऱ्यांना धक्का, ५१ ग्रामपंचायतींसाठी जाेरदार लढत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 12:15 PM2023-11-07T12:15:46+5:302023-11-07T12:17:02+5:30
डहाणू, तलासरी तालुक्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाने २५ पैकी १७ जागा जिंकल्या.
- हितेन नाईक
पालघर : शिवसेनेचा शिंदे गट आणि भाजप या सत्ताधारी आघाडीला ग्रामपंचायत निवडणुकीत धक्का देत विरोधकांनी ५१ ग्रामपंचायतींपैकी २५ जागा जिंकल्या. जिल्ह्यात ठाकरे गटाने ९, महाविकास आघाडीने २, सीपीएमने ९, बविआने ५, राष्ट्रवादीच्या पवार गटाने ४, भाजपने १०, शिवसेना शिंदे गटाने ४, मनसेने एक, अपक्षांनी एक, स्थानिक आघाडीने ३ ग्रामपंचायतींवर विजय मिळविला. डहाणू, तलासरी तालुक्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाने २५ पैकी १७ जागा जिंकल्या.
५१ ग्रामपंचायती, तर ४९ पोटनिवडणुका होत्या. ५१ ग्रामपंचायतींपैकी सफाळेजवळील शेलटे ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता, तर टेंभिखोडावे ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती. त्यात पश्चिम किनारपट्टीवर ठाकरे गटाने माहीम, शिरगाव, सालवड, मासवन, कपासे, आदी ९ ग्रामपंचायतींवर एकहाती वर्चस्व राखले. अन्य दोन जागा जिंकून भाजपला धक्का दिला. या तालुक्यात १६ ग्रामपंचायतींपैकी ९ उद्धव ठाकरे गट, तीन बहुजन विकास आघाडी, एक शिवसेना शिंदे गट, दोन महाविकास आघाडीने जिंकल्या.
तलासरीत माकपचे वर्चस्व कायम
डहाणू तालुक्यातील एकूण १७ ग्रामपंचायतींपैकी ४ भाजप, ४ शिवसेना ठाकरे गट, ४ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, ३ राष्ट्रवादी, एक मनसे आणि एक अपक्षांनी जागा जिंकल्या. तलासरी तालुक्यातील एकूण ८ पैकी ५ ग्रामपंचायती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जिंकल्या, तर भाजपला ३ जागांवर समाधान मानावे लागले. जव्हार तालुक्यात शिंदे गट व भाजपने युती करीत एक जागा जिंकून घेतली. विक्रमगड तालुक्यात एक जागा शिवसेना शिंदे गट आणि एक जागा भाजपने जिंकली. वसई तालुक्यात एकूण ३ जागांपैकी एक भाजप आणि दोन बहुजन विकास आघाडीने जिंकल्या, तर मोखाडा तालुक्यातील चार ग्रामपंचायतींपैकी दोन शिवसेना शिंदे गट, एक भाजप आणि एक राष्ट्रवादीने जिंकली.
आमदारांसह पदाधिकाऱ्यांचे अपयश
शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा यांना कवाडा ग्रामपंचायत राखण्यात अपयश आले. तेथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने विजय मिळविला. शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांच्या माहीम आणि शिरगाव या दोन्ही महत्त्वपूर्ण ग्रामपंचायती ठाकरे गटाने जिंकून जोरदार धक्का दिला. याच गटाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा आणि विद्यमान सदस्या वैदेही वाढाण यांच्या सालवड ग्रामपंचायतीवर ठाकरे गटाने वर्चस्व राखले. शिरगाव ग्रामपंचायतीवर भाजपचे नेते विनोद तावडे, रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्ती सुजित पाटील यांचाही पराभव झाला.