ठाण्यात सातव्या दिवशी ६ टन तर आतापर्यंत ३१ टन निर्माल्य संकलित
By प्रज्ञा म्हात्रे | Published: September 27, 2023 04:46 PM2023-09-27T16:46:10+5:302023-09-27T16:46:25+5:30
दीड दिवसाच्या गणेश विसर्जनाच्यावेळी यंदा १० टनाहून अधिक, पाच दिवसांच्या गणेश विसर्जनावेळी १५ टन निर्माल्य तर सात दिवसांच्या गणेश विसर्जनावेळी ६ टन निर्माल्य असे एकूण ३१ टन निर्माल्य संकलित करण्यात आले.
ठाणे : गणेशोत्सव काळात विसर्जनादरम्यान संकलित करण्यात येणाऱ्या निर्माल्य संकलनाला सातव्या दिवशी देखील गणेशभक्तांनी प्रतिसाद दिला आहे. सातव्या दिवशी सहा टन निर्माल्य संकलित करण्यात आले आतापर्यंत ३१ टन निर्माल्य संकलित झाले होते. सात दिवसांच्या विसर्जनावेळीही अविघटनशिल घटक जसे की, प्लास्टिक, थर्मोकोल यांचे निर्माल्यातील प्रमाण लक्षणियरित्या कमी झाले असल्याचे निदर्शनास आले.
दीड दिवसाच्या गणेश विसर्जनाच्यावेळी यंदा १० टनाहून अधिक, पाच दिवसांच्या गणेश विसर्जनावेळी १५ टन निर्माल्य तर सात दिवसांच्या गणेश विसर्जनावेळी ६ टन निर्माल्य असे एकूण ३१ टन निर्माल्य संकलित करण्यात आले. ठाणे महानगरपालिका आणि समर्थ भारत व्यासपीठ गेली १२ वर्षे गणेशोत्सव काळातील निर्माल्य व्यवस्थापन करीत आहे. प्रत्येक उत्सव हा हरित उत्सव व्हावा व पर्यावरणाचे जतन, रक्षण तसेच सर्वधन व्हावे यासाठी समर्थ भारत व्यासपीठ नेहमीच प्रयत्नशिल असते यात ठाणे महानगरपालिका, रोटरी क्लब ऑफ ठाणे गार्डन सिटी तसेच प्रकल्प पुर्ननिर्माणचे सदस्य सहयोग देत असतात.
सात दिवसाच्या गणपतीत ६ टनाहुन अधिक निर्माल्य संकलित करण्यात आले आहे. या निर्माल्यावर प्रक्रिया करून त्याचे सेंद्रीय खत तयार केले जाणार आहे. तसेच निर्माल्यातील अविघटनशिल घटकांचे वर्गीकरण करून ते पुर्नप्रक्रियेसाठी पाठवण्यात येणार आहेत. यात पर्यावरणस्नेही गणेशभक्त व समर्थ भारत व्यासपीठाशी संलग्न सफाईसेवक महिलांचे अनन्यसाधारण असे योगदान लाभले आहे असे समर्थ भारत व्यासपीठाचे भटु सावंत यांनी सांगितले.
दीड, पाच आणि सात दिवसांच्या गणपती सोबत दहा दिवसांच्या गणपतीच्या विजर्सनाच्यावेळी देखील निर्माल्य संकलित करण्यात येणार आहे. तरी भाविकांनी तलावात,खाडीत निर्माल्य विसर्जित न करता ते विसर्जन घाटावर ठाणे महानगरपालिकेच्या निर्माल्य स्वीकार केंद्रात दान करावे असे समर्थ भारत व्यासपीठाने केले आहे.