ठाण्यात हायव्होल्टेज केबल घरावर पडली; तीन घरांच्या इलेक्ट्रिक मीटर आणि स्विच बोर्डमध्ये शॉर्टसर्किट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 04:03 PM2022-07-07T16:03:39+5:302022-07-07T16:04:35+5:30
या पडलेल्या केबलमुळे तीन घरांमधील इलेक्ट्रिक मीटर आणि स्विचबोर्डमध्ये शॉर्टसर्किट झाले. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. तसेच तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते.
ठाणे - येथील वर्तकनगर परिसरातून गेलेली टाटा पॉवर विद्युत कंपनीच्या ट्रान्समिशन टॉवरमधील एक्स्ट्रा हायव्होल्टेज केबल एका घरावर पडल्याची घटना बुधवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. या पडलेल्या केबलमुळे तीन घरांमधील इलेक्ट्रिक मीटर आणि स्विचबोर्डमध्ये शॉर्टसर्किट झाले. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. तसेच तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते.
येथील वर्तकनगर, नेहरूनगरमधील दामोदर दळवी याच्या घर नंबर १६४ वरून जाणारी टाटा पॉवर विद्युत कंपनीची ट्रान्समेशन टॉवरमधील एक्स्ट्रा हायव्होल्टेज केबल (22 kv क्षमता) मध्यरात्री पडले. यासंदर्भात माहिती मिळताच टाटा पॉवर विद्युत कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी, महावितरण कर्मचाऱ्यांनी आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच, पडलेल्या एक्स्ट्रा हायव्होल्टेज केबलचा विद्युत पुरवठा टाटा पॉवर विद्युत कर्मचाऱ्यांनी तातडीने बंद केला. याचबरोबर त्या ठिकाणचा महावितरण विद्युत पुरवठा, महावितरण कर्मचाऱ्यांनी बंद केला.
टाटा पॉवर कंपनीच्या ट्रान्समेशन टॉवरमधील एक्स्ट्रा हायव्होल्टेज केबल खाली असलेल्या दळवी यांच्या रूमवर पडल्यामुळे त्यांच्यासह त्या परिसरातील सुरज पाल करोतीया आणि सतिश गुरव यांच्या घरांमधील इलेक्ट्रिक मीटर,स्विच बोर्डमध्ये शॉर्टसर्किट झाले.सुदैवाने या घठनेत कोणलाही दुखापत झाली नाही. टाटा पॉवर विद्युत कर्मचाऱ्यांनी केबल दुरुस्तीचे काम तात्काळ हाती घेतले होते. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आली.