ठाणे जिल्ह्यात भाजप, शिंदे गटाचे वर्चस्व, ४२ पैकी सात ग्रामपंचायती बिनविरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 07:25 AM2022-12-21T07:25:41+5:302022-12-21T07:26:03+5:30
जिल्ह्यात ४२ ग्रामपंचायतींपैकी सात ग्रामपंचायती बिनविराेध झाल्या हाेत्या.
ठाणे : जिल्ह्यातील कल्याण, भिवंडी, शहापूर, मुरबाड आदी तालुक्यांत भाजप व शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेनेचा वरचष्मा दिसून आला. जिल्ह्यात ४२ ग्रामपंचायतींपैकी सात ग्रामपंचायती बिनविराेध झाल्या हाेत्या.
३५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी ११४ उमेदवार व २१९ सदस्यांसाठी ६१३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. कल्याणच्या आठ ग्रामपंचायती, भिवंडीत १३ ग्रामपंचायती, शहापूरमध्ये तीन ग्रामपंचायती आणि मुरबाडच्या ११ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली.
मुरबाड तालुक्यात भाजप आणि शिंदे गटाने सर्वाधिक ग्रामपंचायतींवर वर्चस्व पाहायला मिळाले. भाजप आठ, शिंदे गट सहा आणि ठाकरे गटाने दाेन ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. यातील तीन ग्रामपंचायती बिनविराेध झाल्या हाेत्या. या ११ ग्रामपंचायतींच्या या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट व भाजपचे वर्चस्व दिसून आले. काँग्रेस व राष्ट्रवादीला सपशेल अपयश आले आहे.
कल्याण तालुक्यात शिवसेनेच्या ठाकरे, शिंदे गटाने प्रत्येकी तीन ग्रामपंचायतींवर दावा केला. यात वासुंद्रीत ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडीची युती सरस ठरली, तर भाजपने दोन ग्रामपंचायती मिळविल्याचा दावा केला. भिवंडीत १३ ग्रामपंचायतींवर भाजपचा बोलबाला दिसला. भाजपने सर्वाधिक आठ ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. शिंदे गटाला चार,तर ठाकरे गटाला एक ग्रामपंचायत मिळाली. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या कोन ग्रामपंचायतीत भाजपने शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव केला.
शहापूरमध्ये संमिश्र निकाल
शहापूर तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींपैकी नांदवळसाठी एकही उमेदवारी अर्ज आला नव्हता. बिनविरोध बाभळे व चिखलगाव भाजपने दावा केला आहे. कानवेवर उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाने दावा केला. या तालुक्यातील ग्रामपंचायतींबाबत संमिश्र प्रतिसाद दिसला.