ठाणे जिल्ह्यात भाजप नव्हे, शिवसेना हाच माेठा भाऊ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 03:07 PM2023-10-10T15:07:20+5:302023-10-10T15:08:10+5:30
ठाणे, कल्याण सोडणार नसल्याची पदाधिकाऱ्यांची भूमिका
ठाणे : काही दिवसांपासून ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदार संघावरून शिवसेना आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगला असताना, आता शिवसेनेने ठाणे आणि कल्याण हे शिवसेनेचेच बालेकिल्ले असल्याचे भाजपला बजावले आहे. कोणत्याही परिस्थितीत हे दोन्ही मतदारसंघ आम्ही सोडणार नसल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले. ठाण्यासह मीरा-भाईंदर किंवा कल्याण, अंबरनाथ या ठिकाणी शिवसेनेची ताकद आहे. जिल्ह्यात शिवसेना हाच मोठा भाऊ असल्याचा दावा शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी केला.
ठाण्यासह कल्याण काबीज करण्यासाठी काही महिन्यांपासून भाजपकडून रणनीती आखली जात आहे. ठाण्यात तर अनेक नावे भाजपचे संभाव्य उमेदवार पुढे आले. कल्याणमध्ये केंद्रीय मंत्र्यांसह इतर नेत्यांनी वरचेवर हजेरी लावली होती. त्यामुळे भाजप हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ ताब्यात घेणार, अशी चर्चा होती. त्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये वारंवार ठिणगी पडल्याचेही दिसले. भाजपकडून दावा सुरू असताना, शिवसेनेने ठाणे लोकसभा निवडणूक लढविण्याचे स्पष्ट केले .
कार्यकर्त्यांच्या नाराजीचा मतदानावर परिणाम
लोकसभा मतदारसंघ भाजपला सोडला, तर त्याचा फटका विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला बसू शकतो, अशी शंका शिवसेनेला आहे, तसेच कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू शकतो, त्यांची नाराजी तशीच राहिली, तर मतदानावर त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे
लोकसभा झाल्यावर विधानसभा आणि पुढे महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे त्या दृष्टीने विचार करावा लागणार आहे. त्यामुळेच ठाणे आणि कल्याण सोडणे कठीण असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.