ठाणे जिल्ह्यात नफरत छोडो संविधान बचाओ अभियान
By प्रज्ञा म्हात्रे | Published: November 24, 2022 05:17 PM2022-11-24T17:17:33+5:302022-11-24T17:18:02+5:30
२८ नोव्हेंबरपासून सुरू होणार जनसंवाद यात्रा
प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : देशभरातील जन आंदोलनांच्या वतीने नफरत छोड़ो संविधान बचाओ अभियाना अंतर्गत देशातील सुमारे ५०० जिल्ह्यात प्रत्येकी किमान ७५ कि.मी. पदयात्रा काढून जनसंवाद सुरू आहे. त्याच्याच एक भाग म्हणून ठाणे जिल्ह्यात महात्मा फुले स्मृती दिन २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्ये पर्यंत नफरत छोड़ो संविधान बचाओ यात्रा काढण्यात येणार आहे.
‘नफरत छोडो संविधान बचाओ’ या यात्रेचे ठाणे जिल्हा निमंत्रक जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया म्हणाले, आज देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर खुद्द सरकार कडूनच आघात केला जात आहे. कामगार वर्गाला देशोधडीला लावण्यासाठी कामगार कायदे बाद करून लेबर कोड आणले आहे, शेतकरी आत्महत्या करत आहेत, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या सवलती कमी केल्या जात आहेत. ईडी, सीबीआय आणि न्याय यंत्रणा आदी संस्थांचा गैरवापर करून विरोधी विचारांच्या कार्यकर्त्यांना जेल मध्ये कोंडले जात आहे. महिला व दलितांवरील अन्याय अत्याचार वाढत आहेत.
बेरोजगारी ,महागाई प्रचंड गतीने वाढत आहे. देशात अप्रत्यक्षपणे हुकूमशाही गाजवली जात आहे, धर्मांध व सामाजिक सदभाव बिघडवण्यासाठी सत्तेचा गैरवापर हा लोकशाही व संविधानावर वर आघात आहे. अश्या परिस्थितीत सामाजिक जनसंघटनांची व जनतेची जबाबदारी वाढली असून समाजात सलोखा आणि एकजुटीने या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी ही यात्रा देशभर आयोजित करण्यात येत असून, ठाणे जिल्ह्यात होत असलेल्या या अभियानात जनतेने सहभागी व्हावे. असे आवाहन करण्यात येत आहे.
या वेळी बोलताना या यात्रेचे नेतृत्व ज्यांच्याकडे आहे ते ठाण्यातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय मंगला गोपाळ म्हणाले, ठाणे जिल्ह्यातील समतावादी पुरोगामी विचारांचा वारसा जपणार्या विविध संस्था - संघटना आणि राजकीय पक्षांनी एकत्र येऊन धर्म आणि जातीच्या नावाने नफरत पसरवणार्या प्रव्रत्तीना त्यांची जागा दाखवण्याची गरज आहे. भारत हा विविध प्रकारच्या भाषा, धर्म, जाती प्रांत आदींनी नटलेला पण "विविधतेत एकता" दर्शवणारा देश आहे. ही एकता आणि संवैधानिक मूल्य जपणरा भारत आम्हाला हवा आहे.त्यासाठी जनतेशी प्रत्यक्ष संवाद साधणे गरजेचे आहे, म्हणूनच देशात सर्वत्र कुठल्याही पक्षाचा झेंडा किंवा बॅनर न घेता हातात फक्त तिरंगा झेंडा आणि संविधानाची प्रत घेऊन जन संवाद यात्रा काढण्याचे आयोजन आहे. ठाणे जिल्ह्यातील यात्रेच्या नियोजनाची माहिती देताना त्यांनी सांगितले की ठाणे जिल्हयातील ही यात्रा महात्मा फुले स्मृतीदिन सोमवार २८ नोव्हेंबर रोजी भिवंडी येथील डॉ. आंबेडकर पुतळ्यापासून जेष्ठ सामाजिक नेत्या मेधा पाटकर यांच्या उपस्थितीत होणार्या जाहीर सभेने सुरू होईल. भिवंडी – महापोली – कासणे – शहापूर – मुरबाड – अंबरनाथ – वालधुनी – ठाणे या मार्गाने जाऊन यात्रेचा समारोप ठाणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महानिर्वाण दिनाच्या पूर्व संध्येला सोमवार दि. ५ डिसेंबर रोजी होईल. समारोपाच्या कार्यक्रमाला महात्मा गांधींचे पणतु व सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी यांना निमंत्रित केले आहे.
या यात्रेत जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय(NAPM), आर.पी.आय.(सेक्युलर), आर.पी.आय., लेबर फ्रंट, श्रमिक मुक्ती संघटना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्र सेवा दल, समता विचार प्रसारक संस्था, अनुबंध, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, गावठाण कोळीवाडा संवर्धन समिती, स्वराज्य अभियान, श्रमिक जनता संघ, कायद्याने वागा लोक चळवळ अशा ठाणे जिल्ह्यातील अनेक संस्था संघटना सहभागी होत आहेत. या यात्रेत ठाणे जिल्ह्यातील श्यामदादा गायकवाड, राज असरोंडकर, इंदवी तुळपुळे, इफ्तिकार खान, डॉ. गिरीश साळगांवकर, मधुकर उबाळे, अभय भोसले, आत्माराम विशे, रमेश हनुमंते असे अनेक मान्यवर सामाजिक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. पत्रकार परिषदेत ठाण्यातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वंदना शिंदे, ठाण्यातील राष्ट्रवादी कोंग्रेसचे नेते विक्रम खामकर, समता विचार प्रसारक संस्थेचे सुनील दिवेकर, मीनल उत्तुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"