अतिधोकादायक इमारतींचे वीज, पाणी कनेक्शन पालिकेने तोडले; नौपाडा, कोपरी विभाग रडारवर
By अजित मांडके | Published: June 15, 2024 05:02 PM2024-06-15T17:02:39+5:302024-06-15T17:04:23+5:30
६७ इमारती रिकाम्या करण्याची मोहीम; शनिवार पासून जोरदार मोहीम.
अजित मांडके, ठाणे :ठाणे महापालिका क्षेत्रातील अतिधोकादायक इमारतींपैकी व्याप्त असलेल्या सर्व इमारतींचा पाणी पुरवठा, वीज जोडणी आणि मलनि:सारण वाहिन्या तत्काळ तोडण्यात याव्यात. असे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. त्यानुसार शनिवार पासून सर्वच प्रभाग समितीमधून उपायुक्तांसह सहाय्यक आयुक्तांच्या टीमने येथील अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्याबरोबरच ज्या इमारती व्याप्त आहेत, त्यांचे वीज, पाणी आणि ड्रेनेज कनेक्शन खंडीत करण्याची कारवाई सुरु केली. नौपाडा आणि कोपरीत सर्वाधिक अतिधोकादायक इमारती असल्याने सर्वात मोठा हातोडा याच भागात पडल्याचे दिसून आले.
ठाणे महापालिका आयुक्तांनी शुक्रवारी बैठक घेऊन पुढील दोन दिवसात सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या विभागातील अतिधोकादायक (सी वन) आणि धोकादायक (सी टू ए) अशा सर्व इमारतींची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि रहिवाशांना तेथून स्थलांतरित होण्यासाठी संवाद साधावा, असेही निर्देश त्यांनी दिले होते. त्यानुसार शनिवारी नौपाडा आणि कोपरी भागात कारवाईला सुरवात झाली. नौपाडा आणि कोपरीत ६७ धोकादायक इमारती आहेत. त्यातील ३८ इमारती आता रिक्त करण्यात आल्या असल्याची माहिती उपायुक्त शंकर पाटोळे यांनी दिली. २७ इमारती रिकाम्या करुन त्यावर कारवाई करण्याचे प्रभाग समितीने निश्चित केले आहे. यात कोपरी येथील दौलत नगर भागातील १४ इमारतींचा समावेश आहे. शनिवारी या इमारतींच्या ठिकाणी जाऊन येथील रहिवाशांचे प्रबोधन करण्यात आले. तसेच इमारती रिक्त करण्याचे आवाहनही करण्यात आले.
याशिवाय या इमारतींचे वीज, पाणी, ड्रेनेज लाईन कनेक्शन तोडण्यात आले असल्याचेही पाटोळे यांनी स्पष्ट केले. तसेच नौपाड्यातील १२ इमारतींचे देखील वीज, पाणी कनेक्शन खंडीत करण्यात आले आहे तसेच २ इमारतींवर तोडक कारवाई करण्यात आली आहे. इतर प्रभाग समितीमध्ये देखील अशाच पध्दतीने कारवाई केली जात असल्याचे पालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले. महापालिका क्षेत्रात एकूण ९६ अतिधोकादायक इमारती (सी वन वर्गवारी) आहेत. त्यापैकी, ३७ इमारती व्याप्त आहेत. त्यात, नौपाडा आणि कोपरी - २७, माजिवडा - ०१, उथळसर - ०३, कळवा - ०२, मुंब्रा - ०४ अशा इमारतींचा समावेश आहे.