सलग दुसऱ्या दिवशी पावसाची संततधार; वृक्षांची पडझड, वाहनांचे नुकसान 

By अजित मांडके | Published: June 20, 2024 05:01 PM2024-06-20T17:01:05+5:302024-06-20T17:03:05+5:30

बुधवारी सुरु झालेल्या पावसाने गुरुवारी देखील ठाण्यात दमदार हजेरी लावली.

in thane heavy rain for the second day in a row fall of trees damage to vehicles | सलग दुसऱ्या दिवशी पावसाची संततधार; वृक्षांची पडझड, वाहनांचे नुकसान 

सलग दुसऱ्या दिवशी पावसाची संततधार; वृक्षांची पडझड, वाहनांचे नुकसान 

अजित मांडके, ठाणे : बुधवारी सुरु झालेल्या पावसाने गुरुवारी देखील ठाण्यात दमदार हजेरी लावली. पहाटेपासूनच शहराच्या विविध भागात चांगला पाऊस झाला. यात काही सखल भागात पाणी साचल्याचे दिसून आले. तर काही ठिकाणी वृक्षांची पडझड झाली, त्यात काही वाहनांचे देखील नुकसान झाल्याचे दिसून आले. सांयकाळी ५ वाजेपर्यंत शहरात ४५ मीमी पावसाची नोंद झाली. दुसरीकडे दिव्यात पावसाने येथील रहिवाशांची चांगलीच दाणादाण उडविली. नाल्यांची सफाई नीट न झाल्याने सकाळच्या सत्रात झालेल्या पावसाने येथील अनेक भागात गुडघाभर पाणी साचले होते. तर काही रहिवाशांच्या घराच शिरल्याचे दिसून आले.

जून महिना सुरू होऊन पंधरा दिवस उलटून गेले तरी शहरात पुरेशा प्रमाणात पावसाने हजेरी लावली नव्हती. यामुळे वातावरणातही उकाडा कायम होता. परंतु, बुधवारपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरणात निर्माण झालेल्या गारव्याने नागरिकांना दिलासा मिळाला. गुरुवारी पहाटेपासून पाऊस पडायला सुरुवात झाली. यामुळे सकाळी कामाला जाणाऱ्या नागरिकांची तसेच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. ठाणे शहरात सकाळी ८.३० ते ९.३० एक तासाच्या कालावधीत २६.४२ मिमी पाऊस पडला. यामुळे ठाणे महापालिका हद्दीत नऊ ठिकाणी पाणी साचले होते. यात पेढ्या मारुती रोड, कापूरबावडी नाका, गणेश नगर दिवा, विवियांना मॉल परिसर, धर्मवीरनगर मुंब्रा रेतीबंदर, दिवा मन्नत बंगला, चांद नगर, सम्राट नगर आदी ठिकाणी पाणी साचले होते.  येथे महापालिकेच्या वतीने पंप लावून पाण्याचा उपसा करण्यात आला. तर या पावसाने शहरात पाच झाडे पडली तर सात ठिकाणी झाड्यांच्या फांदया पडल्या होत्या. सात झाडे धोकादायक स्थितीत असल्याची तक्रार आपत्ती व्यवस्थापन विभागाला प्राप्त झाल्या होत्या. झाडाच्या फांद्या पडल्याने सावरकर नगर येथे दोन आणि नौपाडा येथे एक अशा तीन वाहनांचे नुकसान झाले. तर सावरकर नगर येथील दुर्घटनेत उत्तम पाटील हे अग्निशमन दलाचे जवान किरकोळ जखमी झाले.  

ठाणे शहराचा मध्य  भाग असणाऱ्या पाचपाखाडी, नौपाडा परिसरात बत्ती गुल झाल्याने येथील नागरीकांचे हाल झाले. पावसामुळे तांत्रिक बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती एम एस सी बी तर्फे देण्यात आली. त्यानंतर सांयकाळच्या सुमारास टप्याटप्याने येथील वीज पुरवठा सुरळीत झाला.

दिव्यात पाणीच पाणी-

दिवा भागातील अनेक ठिकाणी नाल्यातील पूर्ण गाळ काढला गेला नसल्याने गणेश नगर, विकास म्हात्रे गेट, बेडेकर नगर, डी जी कॉम्प्लेक्स, येथे पाणी नागरिकांच्या घरात शिरले होते. तर येथील अनेक भागात गुडघाभर पाणी साचले होते. त्याठिकाणी असलेल्या चिखलातून रहिवाशांना मार्गक्रमण करावे लागत होते. दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त धडा घेणार नसतील तर कामचुकार अधिकाºयांवर कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका उध्दव ठाकरे गटाचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी घेतली आहे. दिवा शहरात पालिका प्रशासनाचे प्रमुख म्हणून सहाय्यक आयुक्त नीट जबाबदारी पार पाडणार नसतील तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली.

Web Title: in thane heavy rain for the second day in a row fall of trees damage to vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.