'आव्हाडांनी वायकरांना शुभेच्छा द्याव्या'; प्रताप सरनाईक यांचा सल्ला
By अजित मांडके | Published: June 18, 2024 05:19 PM2024-06-18T17:19:52+5:302024-06-18T17:23:45+5:30
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून रविंद्र वायकर हे विजयी झालेले आहेत.
अजित मांडके ,ठाणे : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून रविंद्र वायकर हे विजयी झालेले आहेत. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांनी त्यावर बोलण्यापेक्षा वायकर यांना शुभेच्छा द्यायला हव्या, असा सल्ला शिवसेना शिंदे सेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली. 'जो जिता वो सिकंदर' आता त्यावर बोलून काही फायदा नसल्याचेही ते म्हणाले.
ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की एकदा पराभव झाल्यानंतर त्याबाबत पुन्हा मागणी करण्याचा अधिकार नाही.
शिवसेनेचा वर्धापन दिन हा वेगळा ठरणार असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे या मेळाव्यातील विचार ऐकण्यासाठी शिवसैनिकांमध्ये उत्साह असल्याचेही ते म्हणाले. विधानसभेत जास्तीत जास्त जागा निवडून येतील यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठीच ही सभा महत्वाची असल्याचेही ते म्हणाले. दोन वर्षात सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यशस्वी झाले आहेत. राज्यात लोकसभेला केवळ १५ जागा लढल्या आणि ७ जागा निवडून आणल्या. त्यामुळे राज्यात सगळ्यात अधिक स्त्राईक रेट असलेला पक्ष शिवसेना ठरला आहे. तर संजय राऊत सकाळी उठल्यानंतर काय बोलावे याचा विचार त्यांनी रात्रीच केलेला असतो अशी टीकाही त्यांनी केली. त्यातही बाळासाहेबांच्या शिष्याने काय करायचे ते लोकसभेच्या निवडणुकीत करुन दाखविले आहे. आमचा पक्ष किती मोठा आहे हे लोकसभेच्या निकालानंतर स्पष्ट झाले आहे. काही जणांनी बाळासाहेब यांचे मोडीत काढलेले विचार मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी पुन्हा लोकांसमोर आणले आहेत. त्यामुळे बाकी कोण काय बोलत त्यापेक्षा हे आपण मार्गक्रमण करत राहायचे असेही ते म्हणाले.
अजित पवार यांच्या विषयी त्यांनी छेडले असता, या विषयावर आम्ही बोलणार नाही. आम्ही या विषयावर बोलणे अयोग्य आहे असे ते म्हणाले. सरनाईक यांना मंत्रीपद मिळणार का? असा सवाल त्यांना केला असता, सरनाईक यांचे नाव नेहमीच मंत्रीपदासाठी येत आहे. मात्र मुख्यमंत्री हा एक ठाणेकर याचा अभिमान असल्याचे ते म्हणाले. प्रत्येक वेळी विधानसभेचा एक सदस्य म्हणून आपले नाव मंत्रीपदासाठी चालते यावरच मी समाधानी असल्याचे ते म्हणाले. त्यातही मंत्रीपद जर माझ्या नशिबात असेल तर ते कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही.