जोशी-तावडे, एकाच सोसायटीत; पण गेले वेगवेगळ्या वॉर्डात, काय आहे ही भानगड?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 12:00 PM2022-02-15T12:00:02+5:302022-02-15T12:01:18+5:30

इमारतीच्या गेटचे झाले विभाजन : प्रभाग रचनेवर ठाणेकर भडकले

In Thane Joshi-Tawde, in the same society; But gone to different wards for election | जोशी-तावडे, एकाच सोसायटीत; पण गेले वेगवेगळ्या वॉर्डात, काय आहे ही भानगड?

जोशी-तावडे, एकाच सोसायटीत; पण गेले वेगवेगळ्या वॉर्डात, काय आहे ही भानगड?

Next

ठाणे : ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी केलेल्या प्रभागरचनेबाबत ठाणेकरांनी हरकती व सूचनांचा अक्षरश: पाऊस पाडला. शेवटच्या दिवसापर्यंत १, ९६२ हरकती घेण्यात आल्या. एकाच सोसायटीमधील दोन इमारती दोन वेगवेगळ्या वॉर्डात, रेल्वे क्रॉसिंगच्या पलीकडचा भाग एकाच वॉर्डात अशा अनेक सुरस व चमत्कारिक बाबी नोंदलेल्या हरकतींमुळे उघड झाल्या. यामुळे प्रभागरचनेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

काही हरकतींमध्ये भाषा एकसारखी असून, खाली स्वाक्षरी करणारी मंडळी वेगवेगळी आहेत. त्यामुळे या हरकती हा सध्या प्रभागरचनेवरून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या वादंगाचा परिपाक असल्याची चर्चा आहे. ठाणे  महापालिकेच्या निवडणुकांकरिता प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध करण्यात आली; परंतु यावरून सध्या मोठे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. राष्ट्रवादीने सत्ताधारी शिवसेनेवर अंगुलीनिर्देश करीत आपल्या मर्जीतील आराखडा निवडणूक आयोगाला सादर केल्याचा दावा केला आहे, तर राष्ट्रवादीनेच आराखडा बदलल्याचा पलटवार शिवसेनेने केला. आराखडा सादर झाल्यानंतर सीमांकनाच्या मुद्द्यावरून अनेकांनी आक्षेप घेतले. कुठे इमारतीच्या पोडीयमवरून, तर कुठे रेल्वे क्रॉसिंग करून प्रभागांची रचना करण्यात आली. महापालिकेच्या इतिहासात अशा प्रकारची प्रभागरचना केव्हाच झाली नसल्याचे दाखले अनेकांनी दिले.  सत्ताधारी शिवसेनेनेही प्रभागरचनेवर हरकती घेतल्या.
सोमवारी शेवटच्या दिवशी १,९६२ नागरिकांनी निवडणूक विभागाकडे हरकती नोंदविल्या. यामध्ये ढोकाळी, बाळकूम आदी परिसरातून म्हणजेच प्रभाग क्रमांक ३, ४ आणि ९ मधून तब्बल १०० तक्रारी प्राप्त झाल्या. एका सोसायटीचे दोन तुकडे करून दोन प्रभागात समावेश, सोसायटीच्या गेटचे विभाजन करून एक इकडे, तर दुसरे तिकडे अशा चुकीच्या पद्धतीने सीमांकन केल्याचे तक्रारींमध्ये नमूद केले. 

 मजकूर सारखा, सह्या निराळ्या

अनेक तक्रारींमध्ये पत्राचा मजकूरसारखा असून, सह्या करणाऱ्यांची नावे वेगवेगळी आहेत. तसेच मतदार यादीवरून अनेकांनी आक्षेप नोंदविल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी प्रभागातील आपल्याला अनुकूल लोकसंख्या दुसऱ्या प्रभागात गेल्याने त्याचा फटका आपल्याला बसू शकतो हे लक्षात आल्याने अनेक नगरसेवकांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हरकती नोंदवल्या. २६ फेब्रुवारी रोजी हरकतींवर सुनावणी हाेईल.
 

Web Title: In Thane Joshi-Tawde, in the same society; But gone to different wards for election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.