मंत्री एकनाथ शिंदेंचं मौन, शिवसैनिकांचं लक्ष; ठाण्यातील शिवसेनेत नेमकं चाललंय तरी काय? 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 08:12 AM2022-03-07T08:12:45+5:302022-03-07T08:13:15+5:30

ठाण्यात शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत युती करणे याचा अर्थ राष्ट्रवादीला बळ प्राप्त करून देणे हाच आहे. भविष्यात ते शिवसेनेला मारक ठरू शकते, असे काही शिवसैनिकांचे म्हणणे आहे.

In Thane, No alliance with NCP, confusion in Shiv Sena due to statement of Mayor Naresh Mhaske, silence of Eknath Shinde | मंत्री एकनाथ शिंदेंचं मौन, शिवसैनिकांचं लक्ष; ठाण्यातील शिवसेनेत नेमकं चाललंय तरी काय? 

मंत्री एकनाथ शिंदेंचं मौन, शिवसैनिकांचं लक्ष; ठाण्यातील शिवसेनेत नेमकं चाललंय तरी काय? 

Next

ठाणे : शिवसेना-भाजप यांच्यातील युती ही नैसर्गिक असल्याने टिकणारी आहे, या महापौर नरेश म्हस्के यांच्या वक्तव्याची ठाण्यातील शिवसेना, भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये शनिवारी जोरदार चर्चा सुरू होती. सोशल मीडिया व ठाण्यातील कट्ट्यांवर सध्या एकमेकांच्या उरावर बसलेले हे पक्ष पुन्हा एकत्र येणार का, याच गप्पागोष्टी सुरू होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाण्यापेक्षा भाजप केव्हाही बरी, अशी भावना शिवसेनेच्या काही जुन्या-जाणत्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. मात्र भाजपमधील मंडळी युतीबाबत सध्या अधिक सावधपणे बोलत आहेत. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसला महापालिका निवडणुकीत आघाडी करायचीच नाही. परंतु राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्यामुळे आम्ही एकत्र लढण्यास तयार होतो; पण स्थानिकांच्या विरोधामुळे ते शक्य झाले नाही, असे दाखवायचे आहे, असे बोलले जात आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे याबाबत कधी मौन सोडतात, याकडे शिवसैनिकांचे लक्ष आहे.

शेवटच्या महासभेत महापौर म्हस्के यांनी शिवसेना, भाजपच्या युतीबाबत भाष्य केल्याने त्याचे स्वागत काही शिवसैनिकांनी केले. राज्यात महाविकास आघाडी असली तरी ठाण्याच्या राजकारणात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हेच प्रतिस्पर्धी राहिले आहेत. भाजपची ताकद ठाण्यात मर्यादित आहे. त्यामुळे ठाण्यात शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत युती करणे याचा अर्थ राष्ट्रवादीला बळ प्राप्त करून देणे हाच आहे. भविष्यात ते शिवसेनेला मारक ठरू शकते, असे काही शिवसैनिकांचे म्हणणे आहे. दोन महिन्यांपासून या दोन्ही पक्षांत श्रेयाचे राजकारण सुरू आहे. प्रभाग रचनेवरूनदेखील वाद आहेत. त्यामुळे म्हस्के यांनी शिवसैनिकांची नस बरोबर पकडली आहे, असे शिवसेनेतील काही ज्येष्ठ आणि तरुण पदाधिकाऱ्यांनी सांगितले. अनेक शिवसैनिकांना महापालिका निवडणुकीत उमेदवारी हवी असल्याने यावर नावानिशी प्रतिक्रिया द्यायला ते तयार नाहीत. शिवाय ईडी, सीबीआयच्या कारवाया सेना नेत्यांवर सुरू असल्याने भाजपसोबत युतीचे समर्थन करण्यात त्यांना जोखीम वाटते. एकनाथ शिंदे यांनी भूमिका जाहीर केल्यावर बोलू, असे शिवसैनिक सांगतात.

भाजपचे नेते याबाबत बोलायला तयार नाहीत. आम्ही शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांसोबत दोन हात करून पुन्हा राज्यात सत्तेवर येऊ व वेगवेगळ्या शहरांमध्ये सत्ता प्राप्त करू. त्यामुळे म्हस्के यांचे वक्तव्य हे भाजप कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करणारे आहे, असे नेत्यांचे मत आहे. पण, जुन्या-जाणत्या पदाधिकाऱ्यांनी महापौरांच्या वक्तव्याचे खासगीत स्वागत केले. शिवसेना व राष्ट्रवादीसोबत संघर्ष करून स्वबळावर सत्ता आणणे हे स्वप्न असू शकते. परंतु वास्तवात या दोन्हीपैकी एका पक्षासोबत सत्ता येऊ शकते. दोन्ही पक्षांना आपण दुष्मन बनवले तर सत्तेपासून दूर जाण्याची शक्यता अधिक आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीपेक्षा शिवसेना हाच भाजपचा नैसर्गिक मित्र होऊ शकतो. त्यामुळे म्हस्के हे चुकीचे बोलले नाहीत, असे भाजपच्या या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Web Title: In Thane, No alliance with NCP, confusion in Shiv Sena due to statement of Mayor Naresh Mhaske, silence of Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.