ठाण्यात पाऊस अन् खड्ड्यांनी वाहतुकीला ब्रेक, माजीमंत्री बाळासाहेब थोरातही अडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 06:27 PM2022-07-05T18:27:57+5:302022-07-05T20:50:53+5:30

ठाण्यातील महामार्गावर आमदार विजय भाऊसाहेब थोरात उर्फ बाळासाहेब थोरात हे ठाण्याच्या ट्राफिकमध्ये अडकले होते.

In Thane, rains and potholes disrupted traffic, and former minister Balasaheb Thorat also got stuck | ठाण्यात पाऊस अन् खड्ड्यांनी वाहतुकीला ब्रेक, माजीमंत्री बाळासाहेब थोरातही अडकले

ठाण्यात पाऊस अन् खड्ड्यांनी वाहतुकीला ब्रेक, माजीमंत्री बाळासाहेब थोरातही अडकले

Next

विशाल हळदे

ठाणे : पहिल्याच पावसात ठाणे शहरातील विविध रस्त्यांना खड्डे पडल्याचे चित्र दिसून आले आहे. तसेच मुंबई नाशिक महामार्गावरील मानकोली, खारेगाव, आनंद नगर आदींसह इतर भागात खड्डे पडल्याने आणि त्यात सोमवार पासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मंगळवारी सकाळी मुंबई नाशिक महामार्गावर नाशिकडे जाणाऱ्या दिशेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत होते. तसेच कॅडबरी, माजिवडा, आनंद नगर आदी भागातही वाहतुक कोंडी झाल्याचे दिसून आले. या ट्रॅफिकमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचीही गाडी अडकून पडली होती.

ठाण्यातील महामार्गावर आमदार विजय भाऊसाहेब थोरात उर्फ बाळासाहेब थोरात हे ठाण्याच्या ट्राफिकमध्ये अडकले होते. ठाण्यातील विविआना मॉलपासून ते मानकोली नाक्यापर्यंत ट्रॅफिक जाम आहे. नाशिक हायवेवर हा ट्राफिक जाम असून ठाण्यापासून मानकोलीपर्यंत अगदी 10 मिनिटात पोहोचणे शक्य असते. मात्र, जवळजवळ अर्धा ते एक तास प्रत्येक प्रवाशाला या ट्रॅफिकचा सामना करावा लागला. त्यामुळे, या वाहतूक कोंडीला आता पर्याय काय निघणार का, असाही प्रश्न विचारला जात आहे.

मागील वर्षी रस्त्यांवर पडलेल्या खडय़ांवरुन मुख्यमंत्री तथा तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वच विभागांची खरडपट्टी काढली होती. तसेच या खडय़ांवर उपाय योजना तसेच वाहतुक कोंडी झाल्यास मुंबई नाशिक महामार्गावर तात्पुरत्या स्वरुपात अवजड वाहनांसाठी पार्कीग प्लाझाची व्यवस्था करण्यास सांगितले होते. परंतु, त्यानंतरही यंदा त्यात फारसा काही फरक पडल्याचे दिसून आलेले नाही. सोमवार पासून ठाण्यासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यानंतर आता शहरातील अनेक भागातील रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडण्यास सुरवात झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यातही ठाणे महापालिकेच्या माध्यमातून, एमएसआरडीसीकडून देखील रस्ते, उड्डाणपुलावरील रस्ते चकाचक करण्यात आले होते. महापालिकेने तर खड्डे पडू नये म्हणून नव नवीन तंत्रज्ञानाचा देखील अवलंब केला होता. परंतु, पहिल्याच पावसात हे तंत्रज्ञानही फेल झाल्याचे पहावयास मिळाले आहे. घोडबंदर लॉकीम आणि त्यापुढील सेवा रस्त्यावरील डांबर निघण्यास सुरवात झाली आहे. तर शहरातील इतर भागातही रस्त्यांना खड्डे पडल्याचे दिसत आहे.

दरम्यान या खड्यांनी आता वाहतुकीची वाट मंगळवारी अडवल्याचे दिसून आले. मुंबई नाशिक महामार्गावरील मानकोली, खारेगाव टोलनाका आदींसह आनंद नगर जकात नाका, माजिवडा या ठिकाणी रस्त्यांनी खड्डे पडल्याने मुंबई नाशिक महामार्गावर तीन ते चार किमीच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे किंबहुना वाहतुकीचा वेग मंदावल्याचे दिसून आले. नाशिकच्या दिशेने जातांना वाहनांच्या अधिक रांगा लागल्याचे दिसत होते. तसेच माजिवडा नाका, गोकुळ नगर, कॅडबरी आदी ठिकाणी देखील वाहतुक धिम्या गतीन सुरु होती. परंतु यामुळे पाच मिनिटांचे अंतर कापण्यासाठी वाहन चालकांना तब्बल १ ते दिड तासांचा कालावधी जात असल्याचे दुपारी 1 वाजेर्पयत दिसत होते. त्यामुळे वाहतुक पोलिसांची देखील ही कोंडी फोडण्यासाठी तारेवरची कसरत सुरु होती. दुपारनंतर हळू हळू ही कोंडी फोडण्यात येऊन वाहतुक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न वाहतुक पोलिसांनी केले. तसेच वाहतुक विभागाकडून महापालिका तसेच इतर संबधींत प्राधिकरणांना खडय़ांविषयी माहिती देण्यात आली. त्यानुसार आनंद नगर जकात नाका येथील खड्डे बुजविण्यास सुरवात झाली तसेच इतर ठिकाणी देखील तात्पुरत्या स्वरुपात मुलामा लावण्यात आल्याने वाहतुक थोडय़ाफार प्रमाणात का होईना सुरळीत झाल्याचे दिसून आले.

अधिक प्रमाणात झालेल्या पावसाने आणि विविध ठिकाणी पडलेल्या खडय़ांमुळे वाहतुक कोंडी झाली होती. त्यानुसार अधिकचे मनुष्यबळ लावून कोंडी फोडण्यात आली आहे. तर संबधींत यंत्रणांकडून खड्डे बुजविण्यास सुरवात झाली आहे.
डी. कांबळे - प्रभारी वाहतुक पोलीस उपायुक्त, ठाणे
 

Web Title: In Thane, rains and potholes disrupted traffic, and former minister Balasaheb Thorat also got stuck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.