लोकमान्य नगर भागात डोंगराची माती खचली, चार घरांना धोका
By अजित मांडके | Updated: July 8, 2024 16:41 IST2024-07-08T16:39:38+5:302024-07-08T16:41:25+5:30
लोकमान्य पाडा नं. ४ येथील संतोष पाटील नगर येथे चाळ क्रमांक ४ जवळ डोंगराची माती खचून भुस्खलन झाल्याची घटना घडली आहे.

लोकमान्य नगर भागात डोंगराची माती खचली, चार घरांना धोका
अजित मांडके, ठाणे : लोकमान्य पाडा नं. ४ येथील संतोष पाटील नगर येथे चाळ क्रमांक ४ जवळ डोंगराची माती खचून भुस्खलन झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची हानी झाली नसली तरी देखील येथील चार घरांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील चार घरे रिकामी करण्यात आली असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. याठिकाणी धोकापट्टी लावण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
रात्री पासून ठाण्यात पावसाने जोर वाढविला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. दुसरीकडे सोमवारी दुपारी १.१५ वाजताच्या सुमारास लोकमान्य नगर पाडा नं. ४ या भागात संतोष पाटील नगर येथे चाळ क्रमांक ४ जवळ असलेल्या डोंगराची माती खचून भुस्खलन झाल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. येथील डोंगराच्या मातीचा उर्वरीत भागही धोकादायक स्थितीत असल्याचे यावेळी निदर्शनास आले. त्यामुळे येथील दोन झाडे देखील धोकादायक झाल्याचे दिसून आले आहे. एकूणच येथील चार घरांना त्यामुळे धोका निर्माण झाल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव येथील चारही घरे रिकामी करण्यात आली आहेत. येथील रहिवासी त्यांच्या नातेवाईकांकडे वास्तव्यास गेले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. त्यानंतर या ठिकाणी धोकापट्टी लावण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.