गायमुख रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरूवात, वाहतूक कोंडीत पडली भर
By अजित मांडके | Published: May 25, 2024 04:57 PM2024-05-25T16:57:19+5:302024-05-25T17:00:08+5:30
घोडबंदर भागातील गायमुख येथील चढण रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने त्याचा परिणाम शुक्रवारी रात्री पासून येथे वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत होते.
अजित मांडके, ठाणे : घोडबंदर भागातील गायमुख येथील चढण रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने त्याचा परिणाम शुक्रवारी रात्री पासून येथे वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत होते. त्यात शनिवारी सकाळी देखील येथील वाहतूक कोंडीत भर पडल्याचे दिसून आले. वाहन चालकांना येथून ये-जा करतांना, पाच मिनिटांच्या कालावधीसाठी पाऊण ते एक तासांचा कालावधी जात होता. बोरिवली कडे जाणाºया तसेच ठाण्याकडे येणाऱ्या अशा दोन्ही मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.
घोडबंदर भागातील गायमुख घाट रस्ता शुक्रवार २४ मे पासून अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. या महामार्गावरील ७०० मीटर रस्त्याचे सॉईल स्टॅबिलायझेशन करून मजबुतीकरण करण्यात येणार आहे. त्यामूळे शुक्रवार २४ मे ते ७ जून पर्यंत अवजड वाहनांना या मार्गावरुन बंदी घालण्यात आली आहे. ठाणे पालिका हद्दीतील महत्वाचा आणि मुंबई अहमदाबादला जोडणाऱ्या घोडबंदर रोडवर गायमुख घाट रस्त्याचे डागडुजीचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येणार असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे केले जात आहे. या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये व परिसरातील वाहतूक सुरळीत व सुनिश्चित राहावी यासाठी वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय वाहतूक पोलीसांनी घेतला होता.
घोडबंदर रोडवर जड अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक विभागाने केले होते. परंतु या कामामुळे घोडबंदर मार्गांवर मोठ्या प्रमाणावर नागरिकांना वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. अवघ्या पाच ते दहा मिनिटांचे अंतर कापण्याकरिता वाहनचालकांना दीड ते दोन तासाचा कालावधी लागत होता. विशेष म्हणजे या कामामुळे बोरिवली कडे जाणाऱ्या आणि ठाण्याकडे येणाऱ्या अशा दोन्ही मार्गांवर ही वाहतूक कोंडी झाली होती. महत्वाचे म्हणजे रात्रीच्या वेळीही वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागल्याने त्यांचे प्रचंड हाल झाले. वाहतूक पोलीस ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करताना दिसून आले. या वाहतूक कोंडीचा ठाणे आणि बोरिवली येथे कामासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठया प्रमाणात फटका बसल्याचे दिसून आले.
या भागात वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी वाहतुक विभाग, एमबीव्हीव्ही आणि एचएसपी यांच्या माध्यमातून वाहतुक कोंडी सोडविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र सकाळच्या सत्रात फाऊंटनमार्गे अवजड वाहने येतांना अधिक प्रमाणात दिसून आले. त्यामुळे या मार्गावर वाहतुक कोंडी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे ती सोडविण्यासाठी वाहतुक पोलिसांची दमछाक झाली होती.