घोडबंदर रोडवरील वाहतुक कोंडी लवकरच फुटणार; गायमुख ते फाऊंट हॉटेल पर्यंत भुयारी मार्ग
By अजित मांडके | Published: July 6, 2024 04:17 PM2024-07-06T16:17:19+5:302024-07-06T16:21:13+5:30
फाऊंटन हॉटेल जक्शन ते भाईंदर उन्नत मार्गाला मंजुरी.
अजित मांडके, ठाणे : घोडबंदर रोडवर होणारी वाहतुक कोंडी येत्या काळात सुटणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. २ जुलै रोजी एमएमआरडीए प्राधिकरणाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत गायमुख ते फाऊंटन हॉटेल जक्शन पर्यंत भुयारी मार्ग व फाऊंटन हॉटेल जक्शन ते भाईंदर उन्नत मार्ग या दोन्ही प्रकल्पांना मंजूरी देण्यात आली आहे.
घोडबंदर रोडवरील गायमुख ते फाऊंटन हॉटेल जंक्शन या भागात चार पदरी मार्गिका असून या मागील ठाणे शहरातील घोडबंदर रस्त्याचा भाग व पुढील राष्ट्रीय महामागार्चा भाग विस्तृत रूंदीचे आहेत. त्यामुळे गायमुख ते फाऊंटन हॉटेल जंक्शन या भागात मोठ्या प्रमाणावर वाहतुककोंडी होते. तसेच या रस्त्याचा काही भाग घाट स्वरूपातील असून या भागात अवजड वाहनांची वाहतुक देखील मोठ्या प्रमाणावर होत असल्याने वाहतुकीची गती धीमी असते. या समस्येवर उपाय योजना करण्यासाठी या रस्त्याच्या भागाचे रूंदीकरण करणे आवश्यक आहे तथापि, रस्त्याच्या एका बाजुला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व दुसºया बाजुला ठाणे खाडी असल्याने रस्त्याचे रूंदीकरण करणे अश्यक्य आहे त्यामुळे गायमुख ते फाऊंटन हॉटेल जंक्शन या भागात भुयारी मार्ग होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे भाईंदर ते फाऊंटन हॉटेल जंक्शन या भागात देखील वाहतुककोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे.
मुंबई महानगरपालिकेतर्फे वसोर्वा ते भाईंदर या प्रकल्पाचे काम सुरू असल्याने भाईंदर ते घोडबंदर रोडपर्यंत येण्याकरिता अंतर्गत रस्त्याचा वापर करण्यात येणार असून खाडी किनारा लगत असणारा खारफुटीचा भाग लक्षात घेता वाहतुककोंडीवर उपाय योजना करण्यासाठी भाईंदर ते फाऊंटन हॉटेल जंक्शन पर्यंत उन्नत मार्ग होणे गरजेचे आहे. ठाणे शहरातून घोडबंदर मार्गे वसई, विरार, मीरा रोड तसेच ठाणे ते भाईंदर येथे जाण्यासाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतुककोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.
घोडबंदर रोडवरील वाहतुककोंडी दुर करण्यासाठी गायमुख ते फाऊंटन हॉटेल जंक्शन या भागात भुयारी मार्ग बांधण्यात यावा तसेच भाईंदर ते फाऊंटन हॉटेल जंक्शन पर्यंत उन्नत मागार्ची निर्मिती व्हावी यासाठी सरनाईक हे गेल्या ७-८ वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा करीत होते. त्यांच्या पाठपुराव्याला यश येऊन मंगळवारी झालेल्या एम.एम.आर.डी.ए.च्या बैठकीमध्ये वसई, फाऊंटन हॉटेल जंक्शन ते गायमुख या भागात भुयारी मार्ग बांधण्यासाठी तसेच गायमुख ते वसई भुयारी मागार्ने येणाऱ्या वाहनांना पुढे मीरा रोड, भाईंदरला अतिवेगाने जाता यावे यासाठी फाऊंटन हॉटेल जंक्शन, वसई ते भाईंदर पर्यंत उन्नत मागार्ची निर्मिती करण्यासाठी एम.एम.आर.डी.ए.चे महानगर आयुक्त संजय मुखर्जी यांनी मंजुरी दिली आहे.
गायमुख ते फाऊंटन हॉटेल जंक्शन या भुयारी मागार्साठी अंदाजे ११५०० कोटी रुपये व भाईंदर ते फाऊंटन हॉटेल जंक्शन या उन्नत मागार्साठी अंदाजे ८५०० कोटी असे दोन्ही प्रकल्पांना अंदाजे २० हजार कोटी खर्च अपेक्षित आहे. गायमुख ते फाऊंटन हॉटेल जंक्शन या भागात भुयारी मागार्ची निर्मिती करण्यात येणार असून गायमुख ते फाऊंटन हॉटेल या भागाची एकूण लांबी ५.५ किमी असून या अंतर्गत प्रत्येकी ३.५ किमी लांबीचे दोन स्वतंत्र बोगदे ३+३ असे सहा पदरी बांधण्यात येणार आहेत. तसेच भाईंदर ते फाऊंटन हॉटेल जंक्शन पर्यंतच्या रस्त्याची एकूण लांबी १० किमी असून ४+४ असे आठ पदरी उन्नत मागार्ची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात ठाण्यावरून वसई, विरार, मीरा रोड तसेच भाइर्दरकडे जाणाऱ्या प्रवाश्यांची वाहतूक कोंडीपासून सुटका होणार आहे.