ठाणे: पावसामुळे सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी; मुंबई-नाशिक महामार्गावर फटका, खड्डयांचीही भर
By जितेंद्र कालेकर | Published: September 16, 2022 09:40 PM2022-09-16T21:40:24+5:302022-09-16T21:41:22+5:30
मुसळधार पावसामुळे शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी मुंबई नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: मुसळधार पावसामुळे शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी मुंबई नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. हाच प्रकार घोडबंदर मार्गावरही असल्यामुळे ठाणे ते कोपरी आणि ठाणे ते घोडबंदर तसेच कशेळी आणि भिवंडीपर्यंतच्या मार्गावर सकाळी आणि सायंकाळच्या सुमारास वाहतूकीचा वेग मंदावला होता.
खारेगाव ब्रिजवरील खड्डे आणि कशेळीकडे जाणाऱ्या मार्गावर मोठया प्रमाणात पाणी साचल्यामुळे ही वाहतूक कोंडी झाली होती. त्यातच रस्त्यांवरील खड्डयांमुळे चालकांची मोठी कसरत होत होती. बाळकूम ते कापूरबावडी आणि कापूरबावडी नाका ते कशेळी या मार्गावर तर खडयांची संख्या वाढल्यामुळे वाहन चालकांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागला. बाळकूम ते माजीवडा आणि माजीवडा ते तीन हात नाका या मार्गावर सकाळी ८ ते दुपारी १२ या दरम्यान तसेच सायंकाळी ५ ते रात्री ८ या दरम्यान मोठया प्रमाणात वाहनांच्या रांगा होत्या. अनेक ठिकाणी अर्ध्या तासाच्या अंतरासाठी वाहन चालकांना एक तासांहून अधिक कालावधी लागत होता. खारेगाव ब्रिजवरील खड्डयांमुळे मुंब्र आणि कल्याणकडे जाणारी वाहतूकही खोळंबली होती. तर कशेळीकडे जाणाºया मार्गावरही खड्डे आणि पाणी भरल्यामुळे भिवंडीकडे जाणारी वाहतूक कूर्म गतीने सुरु होती.
दरम्यान, कोपरी पूलावरील बहुतांश खड्डे बुजविण्यात आल्यामुळे या मार्गावर वाहन चालकांना तुलनेने तितका त्रास झाला नाही. परंतू, मुंबई नाशिक मार्गावरील कोंडीमुळे शहरांतर्गत मार्गांवरील कॅडबरी ते वर्तकनगर, खोपट ते टेंभी नाका अशी कोंडी झाली होती. तर शहरातील वंदना सिनेमा आणि गजानन महाराज चौक ते राम मारुती रस्त्यावरही मोठया प्रमाणात पाणी साचल्यामुळे चालकांची दुपारच्या वेळीही मोठी कसरत झाली.
अशी झाली कोंडी-
शहरातील मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका ते कॅडबरी जंक्शन, कशेळी-काल्हेर, शिळफाटा भागात रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे या भागातील वाहतूकीचा वेग मंदावून वाहतूक कोंडी झाली होती. दुपारी ४ नंतरही या मार्गांवर वाहतूक कोंडी असल्याचे चित्र होते.
ठाणे शहरातून कशेळीकडे जाणाऱ्या मार्गावर पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे सकाळी ८ ते १२ आणि सायंकाळी ५ ते रात्री ८ या दरम्यान मोठया वाहनांची वाहतूक थांबविली होती. मात्र, तरीही खड्डे आणि पाण्यामुळे वाहतूकीला खोळंबा झाला होता. वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांची जादा कुमक तैनात केली होती. - गणेश गावडे, प्रभारी पोलीस उपायुक्त, नियंत्रण शाखा, ठाणे.