सोनसाखळी चोरणारे दोघे अटकेत; ११ गुन्हे उघडकीस, १० लाखांचा ऐवज हस्तगत

By अजित मांडके | Published: July 13, 2024 04:46 PM2024-07-13T16:46:12+5:302024-07-13T16:47:01+5:30

महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने खेचून पळ काढणाºया दोन जणांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे.

in thane two gold chain thieves arrested 11 crimes revealed compensation of 10 lakhs seized | सोनसाखळी चोरणारे दोघे अटकेत; ११ गुन्हे उघडकीस, १० लाखांचा ऐवज हस्तगत

सोनसाखळी चोरणारे दोघे अटकेत; ११ गुन्हे उघडकीस, १० लाखांचा ऐवज हस्तगत

अजित मांडके, ठाणे : महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने खेचून पळ काढणाºया दोन जणांना ठाणेपोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून जबरी चोरीचे ११ गुन्हे उघडकीस आले असून या गुन्ह्यातील १० लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. मुंबई, ठाणे आणि कल्याण परिसरात हे दोघे सोनसाखळी चोरी करीत असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. आशिष कल्याण सिंग(३३) आणि अमितकुमार राकेश सिंग (२६) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

मुळचे उत्तरप्रदेशचे रहिवाशी असलेले हे दोघेजण ठाण्यात सावरकरनगर भागातील नातेवाईकांकडे काही दिवस राहण्यासाठी यायचे आणि याच काळात जबरी चोरीचे गुन्हे करायचे, अशी माहिती तपासात उघडकीस आली आहे. 

नातेवाईकांकडे वास्तव्यास आल्यानंतर याच कालावधीत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने खेचून पोबारा करायचे, अशी माहिती वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी दिली. चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी खेचून पोबारा केला होता. चितळसर पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल होताच, वरिष्ठ पोलीस निरिक्षक गिरीश गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक प्रशांत सांगळे यांच्या पथकाने त्याचा तपास सुरू केला होता. यामध्ये घटनास्थळावरून आरोपी ज्या दिशेने पळून गेला, त्या भागातील सी सी टिव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरणाची पाहाणी केली. त्याआधारे पथकाने आशिष सिंग याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यात त्याने जबरी चोरीच्या गुन्ह्याची कबुली देऊन अमितकुमार सिंगच्या मदतीने हे गुन्हे करत असल्याची माहिती पथकाला दिली. त्यानुसार पथकाने अमितकुमारचा शोध घेऊन त्याला बोरिवली येथून अटक केली. त्याचा साथीदार रोहित उर्फ विशाल हा फरार असून त्याचा पथकाकडून शोध सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. 

मुंबई, ठाणे आणि कल्याण परिसरात दोघांनी जबरी चोरीचे ११ गुन्हे केल्याची बाब उघडकीस आली आहे. यामध्ये चितळसर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ३, कासारवडवली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील २, कापुरबावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १, खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ३, नौपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १, गोरेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १ जबरी चोरीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. या गुन्ह्यात आरोपींनी चोरलेले १२२ ग्रॅम वजनाचे ८ लाख ५४ हजार रुपये किंमतीचे दागिने आणि दोन दुचाकी असा १० लाख १४ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

Web Title: in thane two gold chain thieves arrested 11 crimes revealed compensation of 10 lakhs seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.