अपघातात दोन्ही गाड्या खड्ड्यात पडल्या; गाड्यांमध्ये अडकलेल्या दोघांना स्थानिकांनी काढले बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 23:30 IST2023-07-08T23:29:23+5:302023-07-08T23:30:15+5:30
या अपघातात दोन महिला कारमध्ये डकल्या होत्या, त्यांना बाहेर काढण्यात स्थानिक नागरिकांना यश आले असून महिला जखमी झाल्या आहेत.

अपघातात दोन्ही गाड्या खड्ड्यात पडल्या; गाड्यांमध्ये अडकलेल्या दोघांना स्थानिकांनी काढले बाहेर
ठाणे : कारचालकाचा त्याच्या गाडीवरील ताबा सुटल्याने दुसऱ्या कारला धडक दिल्याची घटना शनिवारी साडेसात वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील मानपाडा परिसरामधील खेवरा सर्कल जवळ घडली. या धडकेत दोन्ही गाड्या सेफ्टी बॅरीगेटचे पत्रे तोडून बाजूच्या बांधकाम सुरू असलेल्या पझल पार्किंगच्या टाकीसाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये जाणून उलटल्या. त्यामध्ये दोन महिला अडकल्या होत्या, त्यांना बाहेर काढण्यात स्थानिक नागरिकांना यश आले असून महिला जखमी झाल्या आहेत. पण, त्यांची नावे अद्यापही समजू शकलेले नाही. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
मानपाडा, खेवरा सर्कलजवळ तळ अधिक २६ मजली ब्रसिलिया बिल्डिंग आहे. त्याच्या तळ मजल्यावरील पझल पार्किंगमध्ये पार्क केलेल्या विराज गोसावी यांच्या मालकीच्या गाडीला शैलेश चौधरी यांच्या मालकीच्या गाडीमधील चालकाचा त्या गाडीवरील ताबा सुटल्याने धडक दिली. दरम्यान दोन्हीही गाड्या सेफ्टी बॅरीगेटचे पत्रे तोडून बाजूच्या बांधकाम सुरू असलेल्या पझल पार्किंगच्या टाकीसाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये उलटल्या.यावेळी, त्या गाड्यांमधील दोन व्यक्तींना दुखापत झाली आहे. अशी माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल या दोन्ही विभागांनी धाव घेतली. तर अपघात होऊन वाहनातून खड्ड्यामध्ये पडलेल्या व्यक्तींना स्थानिक नागरिकांनी बाहेर काढण्यात यश आले असून, उपचाराकरिता त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले अशी माहिती स्थानिकांनी दिली. पण, त्यांची नावे अद्यापही समजू शकले नाही. तसेच अपघात झालेल्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांकडून धोकापट्टी बांधण्यात आली आहे.अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.