पालिकेतील पैसे घेतानाच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी प्रशासनाने त्या अधिकाऱ्याचा पदभार काढून घेत मागितला खुलासा
By धीरज परब | Published: April 16, 2023 02:58 PM2023-04-16T14:58:01+5:302023-04-16T19:53:39+5:30
महापालिका मुख्यालयातील ४ थ्या मजल्यावर लेखा परीक्षक विभाग असून कार्यालयात लेखा अधिकारी बसतात.
मीरारोड- मीरा भाईंदर महापालिका मुख्यालयात एक महिला अधिकारी आणि २ कर्मचारी यांच्या उपस्थितीत पैसे मोजून पाकिटात टाकण्याच्या व्हायरल व्हिडीओ क्लिप प्रकरणी खळबळ उडाली आहे. पालिका आयुक्तांच्या आदेशा वरून त्या महिला अधिकाऱ्यास नोटीस बजावून खुलासा मागवण्यात आला असून लेखापरीक्षण विभागातील पदभार काढून घेतला आहे.
महापालिका मुख्यालयातील ४ थ्या मजल्यावर लेखा परीक्षक विभाग असून कार्यालयात लेखा अधिकारी बसतात. लेखा अधिकारी चारुशीला खरपडे यांच्या दालनातील व्हायरल व्हिडीओ मध्ये खरपडे सह सार्वजनिक आरोग्य विभागाचे कार्यालयीन अधीक्षक दत्तात्रय वरकुटे व मास्क घातलेला आणखी एक कर्मचारी तसेच अन्य व्यक्ती दिसत आहेत . तसेच २ हजार ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल मोजताना व पांढरे कागदी पाकीट आदी दिसून आले .
मास्क घातलेले असल्याने तो कोविड काळातील व्हिडीओ असल्याचा अंदाज आहे . या व्हायरल व्हिडीओ प्रकरणाची आयुक्त दिलीप ढोले यांनी दखल घेत खरपडे यांच्या कडील लेखा परीक्षक विभागाचा कार्यभार काढून घेतला आहे . त्यांना व्हिडीओ प्रकरणी नोटीस बजावून खुलासा सादर करण्यास सांगितले आहे . तर पैसे मोजतानाच्या व्हिडिओतील ठेकेदार व्यक्ती हे वरकुटे यांच्या सोबत आल्याचा संशय असून सार्वजनिक आरोग्य विभागाशी संबंधित प्रकरण असताना केवळ खरपडे यांनाच नोटीस बजावून खुलासा मागवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे . सदर व्हिडीओची दखल ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेतली असून ते या बाबतची माहिती घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले