त्या १८ मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार नेमली समिती; ठाणे महापालिका आयुक्तांनी दिली माहिती
By अजित मांडके | Published: August 13, 2023 03:53 PM2023-08-13T15:53:33+5:302023-08-13T15:53:54+5:30
ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच दिवसात झालेल्या १८ रुग्णांच्या मृत्यू प्रकरणाची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे.
ठाणे : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच दिवसात झालेल्या १८ रुग्णांच्या मृत्यू प्रकरणाची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. त्यानुसार त्यांच्या आदेशानुसार या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एक चौकशी समिती नेमण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली आहे. या समितीमध्ये राज्याचे आरोग्य सेवेचे आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली ही समिती नेमण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शनिवारी रात्री १०. ३० ते रविवारी सकाळी ८.३० वाजेच्या वेळेत कळवा रुग्णालयात विविध आजारांनी त्रस्त असलेल्या १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार ही समिती नेमण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या समितीत राज्याच्या आरोग्य सेवेचे आयुक्त, आरोग्य संचालक, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जेजे रुग्णालयातील तज्ञ आदींचा यात समावेश असणार असल्याची माहिती त्यांनी कळवा रुग्णालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या प्रकरणाची पारदर्शक चौकशी व्हावी या उद्देशाने महापालिकेची चौकशी समिती न नेमता बाहेरील तज्ञांची समिती नेमण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
तसेच लवकरच या समितीची बैठक होईल आणि रुग्णांच्या मृत्युचे नेमके कारण समोर येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. रुग्णालयात वेगवेगळ्या ताराखांना कळवा रुग्णालयात दाखल झाले होते. परंतु काही रुग्ण हे इतर रुग्णालातून या ठिकाणी आणले होते, परंतु झालेले मृत्यु हे दुर्देवी असून रुग्णांच्या नातेवाईकांनी जे काही आरोप केलेले आहेत, त्यानुसार त्यांच्याकडून देखील माहिती घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मृत्यू नंतरही उशीराने पोर्स्टमार्टन केले जात असल्याचा प्रश्न केला असता, कळवा रुग्णालयात पोस्टमार्टन केले जातात हे दिवसाच्या कालावधीत केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु २४ तास पोर्स्टमार्टन केले जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. त्यामुळेच या रुग्णांच्या बाबतीत देखील पोर्स्टमार्टन उशिराने झाल्याचे त्यांनी सांगितले.
रुग्णालयासाठी निधी केव्हाही कमी पडू दिलेला नाही. तसेच राज्य शासनाने नुकताच ६० कोटींचा निधी मंजूर केलेला आहे. त्यानुसार ज्या ज्या महत्वाच्या गोष्टी करणे गरजेचे आहे, त्या प्राधान्याने केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अतिजोखमीचे रुग्ण असतील तर काही वेळेस त्यांनी बाहेरुन मेडीसीन आणावे लागत आहे. परंतु रुग्णालयात औषधांची कमतरता नसल्याचेही त्यांनी सांगितले.