भविष्यात ठाण्यातून तेंडुलकर, गावसकर निर्माण होतील! अर्जुन रणतुंगा यांनी व्यक्त केला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 01:12 PM2023-05-24T13:12:33+5:302023-05-24T13:12:55+5:30
राम सेतू झाला तर आपण अर्ध्या तासात भारतातून श्रीलंकेला पोहोचू आणि तशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करूया
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : लहान मुले ही उद्याचे भविष्य आहेत, मग ती भारतातील असोत वा श्रीलंकेतील. त्यांनी क्रीडा क्षेत्रात आल्यावर फिटनेसवर जास्त लक्ष केंद्रित करावे. क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून मुलांचे आरोग्य राखणे भारताच्या भविष्यासाठी चांगले आहे. भविष्यात कदाचित आपल्या भागातून सचिन तेंडुलकर आणि सुनील गावसकर निर्माण होऊ शकतात. अनेक दिग्गज क्रिकेटपटू हे अशाच छोट्या छोट्या भागांतून आलेले असतात, असे प्रतिपादन श्रीलंकेचे विश्वकप विजेते माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांनी मंगळवारी ठाण्यात केले.
स्व. रामचंद्र जनार्दन ठाकुर तरणतलाव येथे आमदार प्रताप सरनाईक यांच्या आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या ‘व्यायामशाळेचे उद्घाटन’ रणतुंगा यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्यांनी लहान मुलांशी संवाद साधला. रणतुंगा म्हणाले की, राजकारणी म्हणून आम्हाला जनतेसाठी काम करावे लागते जे मी गेली २० वर्षे करीत आहे. सरनाईकही तेच करीत आहेत. मी लहान असताना क्रिकेटसाठी पर्यायाने क्रीडा क्षेत्रामध्ये फारशा सुविधा नव्हत्या. परंतु हल्ली लहान मुलांसाठी अनेक सोयीसुविधा निर्माण झाल्या आहेत. याठिकाणी स्विमिंग पूल आहे, व्यायामशाळा आहे. तसेच, त्यांना क्रिकेटचे साहित्य मिळाले आहे. त्यामुळे त्यांनी क्रिकेट तसेच, इतर क्षेत्रांमध्ये आपला नावलौकिक मिळवावा. ठाण्यात येऊन आनंद झाल्याचे सांगत तरुण पिढीने क्रीडा क्षेत्रात यावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
अनावश्यक गोष्टीमध्ये लहान मुले आपला वेळ खर्ची घालतात आणि आपल्या भविष्याचे नुकसान करतात. सरनाईक यांनी हाती घेतलेली संकल्पना कौतुकास्पद आहे. यातून भारतासाठी चांगले क्रिकेटपटू निर्माण होऊ शकतात. भारतीय क्रिकेट खेळाडू खूप संघर्ष करून मोठे झाले आहेत, असेही ते म्हणाले. या संपूर्ण कार्यक्रमाचे पूर्वेश सरनाईक यांनी प्रास्ताविक केले.
‘...तर अर्ध्या तासात श्रीलंकेत पाेहाेचू’
सरनाईक म्हणाले, आता राम मंदिर होत आहे, राम सेतू झाला तर आपण अर्ध्या तासात भारतातून श्रीलंकेला पोहोचू आणि तशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करूया. दीड महिन्यात स्केटिंग ट्रॅक सुरू करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले. या कार्यक्रमाला रणतुंगा यांचे निकटवर्तीय व्यंकट, विहंग सरनाईक उपस्थित होते.