पुढच्या दोन वर्षांमध्ये मुंबई, ठाणे महापालिका खड्डेमुक्त ! - मुख्यमंत्री

By सुरेश लोखंडे | Published: June 25, 2023 03:37 PM2023-06-25T15:37:19+5:302023-06-25T15:37:34+5:30

ठाणे शहरात विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण तसेच भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी झाले.

In the next two years, Mumbai, Thane Municipal Corporation pothole-free! - Chief Minister Eknath Shinde | पुढच्या दोन वर्षांमध्ये मुंबई, ठाणे महापालिका खड्डेमुक्त ! - मुख्यमंत्री

पुढच्या दोन वर्षांमध्ये मुंबई, ठाणे महापालिका खड्डेमुक्त ! - मुख्यमंत्री

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : पावसाळ्यातील खड्यांचा मुद्दा यंदाही ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. त्यास अनुसरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणले ‘पुढच्या दोन, तीन वर्षांमध्ये मुंबई महापालिका खड्डेमुक्त होईल. ठाणे शहरही खड्डेमुक्त करायचे आहे. खड्डे मुक्त मुंबई करण्यासाठी धाडस लागते आणि आम्ही ते दाखविण्याचे काम केले. या कामांसाठी महापालिकेच्या मुदत ठेवीचे पैसे वापरल्याची ओरड होत आहे. परंतु चित्र तसे नाही. आमचे सरकार आले, त्यावेळेस ७७ हजार कोटीच्या मुदत ठेवी होत्या. त्यात ११ हजार कोटींनी वाढ होऊन ठेवींचा आकडा ८८ हजार कोटी इतका झाला आहे’, असेही त्यांनी रविवारी ठाण्यात स्पष्ट केले.

 ठाणे शहरात विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण तसेच भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी झाले. त्यानिमित्ताने ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बाेलत हाेते. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, मुंबई महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी पंधरा वर्षांपूर्वी सिमेंट काँक्रीटचे रस्ते करण्याचा निर्णय घेतला असता तर, पालिकेचे साडेतीन हजार कोटी रुपये वाचण्याबरोबरच अपघातामध्ये गेलेले बळी वाचले असते, असे स्पष्ट करून त्यांनी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. करोना काळामध्ये सहाशे रुपयांची शव पिशवी सहा हजार रुपयांना कुणी विकली, असा गाैप्यस्फाट करीत त्यांनी सत्य लोकांना कळण्यासाठी ‘ दुध का दुध, पाणी का पाणी’ झाले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

मुख्य मंत्री पुढे म्हणाले ‘ आता चौकशी होणार म्हणून मोर्चा काढणार आहेत. पण, त्यावेळी तुम्हीच सत्तेत होता. ते तुम्हीच का केले होते, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावाला. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते, त्यावेळेस परदेशी गुंतवणूकीत राज्य प्रथम क्रमांकावर होते. महाविकास आघाडीचे सरकार आले, त्यावेळी पहिल्यावर्षी गुजरात तर, दुसऱ्यावर्षी कर्नाटक प्रथम क्रमांकावर होते. त्यानंतर आपले सरकार आल्यावर परदेशी गुंतवणुकीत राज्य पुन्हा पहिल्या क्रमांकावर आले. राज्यात एक लाख १८ हजार कोटी रुपयांची गुंतवणुक झाली आहे. केंद्रात आणि राज्यात समविचारी पक्षांचे सरकार असते, तेव्हाच गुंतवणुकदार विश्वास ठेवून अशी गुंतवणुक करतात, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

 सुरू झालेल्या पावसाने आपला आनंद द्विगुणीत केला आहे. बळीराजा शेतकरी हा आपला मायबाप असून अन्नदाता आहे. त्याच्यावर कुठले संकट येऊ नये म्हणून आपण नेहमी साकडे घालतो. त्यामुळे पाऊस चांगला होईल आणि लांबलेला पाऊस पुर्ण कोटा भरून काढेल, असे सुताेवाचही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. ‘पंढरीच्या वारीसाठी टोल माफ तसेच जास्त बसगाड्या सोडण्याबरोबरच १५ लाख वारकऱ्यांचा एक लाखांचा विमा उतरविण्यात आला आहे. यंदा पांडुरंगाची पूजा होईल, तेव्हा दर्शन बंद राहणार नाही. मुखदर्शन पण चालूच राहणार आहे, असेही ते म्हणाले.

 ज्या शहरांचे रस्ते मोठे, त्या शहरांचा विकास होतो. त्यामुळेच समृद्धी महामार्ग, घाटकोपर ते घोडबंदर फ्री वे, ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग तसेच इतर प्रकल्प राबविले जात आहेत. जे अधिकारी चांगले काम करतील, त्यांचा सत्कार केला जाईल. पण, जे काम करणार नाहीत, त्याच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा दिला आहे.
घोडबंदरला वाढीव पाणी-

 एमएमआरडीएच्या देरर्जी प्रकल्पातील पाणी पालघरच्या प्रकल्पांसाठी मंजुर करण्यात आले आहे. या प्रकल्पातून घोडबंदर विभागाला २०० दशलक्षलीटर इतके पाणी मिळावे, अशी मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी कार्यक्रमात बोलताना केली. त्यावर घोडबंदरच्या वाढीव पाणयासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल. या भागाला वाढीव पाणी मिळत असेल तर नक्की देण्यात येईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट करून ‘घोडबंदरच्या पाणी पुरवठा प्रकल्पासाठी अमृत योजनेमधून ३२३ कोटी रुपये मिळाले’ असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Web Title: In the next two years, Mumbai, Thane Municipal Corporation pothole-free! - Chief Minister Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.