ठाणे जिल्ह्यातील बडा नेता शिंदे गटात, काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीला दिली होती सोडचिठ्ठी, आता शिंदेंनी सोपवली मोठी जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 12:14 PM2022-10-14T12:14:54+5:302022-10-14T12:17:57+5:30
Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का दिला आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रावादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणारे राष्ट्रवादीचे ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटात आणले आहे.
ठाणे/मुंबई - बंडखोरी करत उद्धव ठाकरेंना आव्हान दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांना ४० हून अधिक आमदारांसह १२ खासदार आणि शिवसेनेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला होता. दरम्यान, एकनाथ शिंदेंसोबत येणाऱ्या समर्थकांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. आता एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का दिला आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रावादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणारे राष्ट्रवादीचे ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटात आणले आहे. त्यांची शिंदे गटाचे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
गतवर्षी शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी बदलेल्या राजकीय परिस्थिती पुन्हा एकदा पक्षांतर केले आहे. सुरेश म्हात्रे यांनी काल एकनाथ शिंदेंची भेट घेऊन युती सरकारला पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर त्यांची भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच नियुक्तीचे पत्रही त्यांना देण्यात आले. यावेळी माजी आमदार पांडुरंग बरोरा आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांनी काल भेट घेऊन युती सरकारला आपला पाठिंबा जाहीर केला. यावेळी त्यांची भिवंडी लोकसभा मतदारसंघ संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.याबाबतचे नियुक्तीचे पत्र बाळ्यामामा यांना सुपूर्द करण्यात आले pic.twitter.com/Q5kpohYjlh
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 14, 2022
ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणात दबदबा असलेले शिवसेनेचे माजी जिल्हा संपर्कप्रमुख तथा ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी गेल्यावर्षी शिवसेना पक्ष सदस्यत्वासह ठाणे जिप सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काही काळाने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र वर्षभरातच त्यांनी पक्ष बदलला आहे.