राज्यस्तरीय सुकाणू समितीत प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांची निवड
By प्रज्ञा म्हात्रे | Published: September 6, 2023 05:58 PM2023-09-06T17:58:59+5:302023-09-06T17:59:07+5:30
नवीन शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सांस्कृतिक विषयांचे तज्ज्ञ म्हणून सुकाणू समितीत समावेश
ठाणे : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शालेय शिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय सुकाणू समिती गठीत करण्यात आली असून या समितीत सांस्कृतिक विषयांचे तज्ज्ञ म्हणून ज्येष्ठ नाटककार-साहित्यिक प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांची निवड करण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाकडून २०२० मध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. नवीन शैक्षणिक धोरणाद्वारे पायाभूत स्तरापासून पदवी स्तरापर्यंतच्या शिक्षण पद्धतीत रचनात्मक बदल करण्यात येत आहेत. राज्यातील सर्व शाळांमध्ये नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी समन्वय यंत्रणा (नोडल एजन्सी) म्हणून शालेय शिक्षण व क्रीडा विभाग कार्यरत आहे. यासंदर्भात राज्यस्तरीय सुकाणू समिती गठीत करण्यात आली असून त्याबाबतचा शासननिर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जारी केला आहे.
शालेय शिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत ठाण्यातील प्रसिद्ध नाटककार-साहित्यिक प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांची तज्ज्ञ सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. प्रा. डॉ. प्रदीप ढवळ हे शैक्षणिक, साहित्यिक, कला व सांस्कृतिक क्षेत्रात गेली चार दशके सक्रिय आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, स्वामी विवेकानंद यांचे विचार व कार्याचा परिचय करून देणारी नाटके, तसेच जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांच्यावरील चरित-कादंबरी व अन्य पुस्तकांचे लेखन-संपादन त्यांनी केले आहे. प्रा. डॉ. प्रदीप ढवळ हे सध्या कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत असून मराठी भाषा व साहित्याच्या प्रसार व विकासासाठी सक्रिय आहेत. ‘ठाणे गौरव पुरस्कार’, ‘साहित्य भूषण पुरस्कार’, ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ असे २५ हून अधिक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. शिक्षण धोरणाबद्दलच्या राज्यस्तरीय सुकाणू समितीत प्रा. डॉ. प्रदीप ढवळ हे सांस्कृतिक विषयांचे तज्ज्ञ म्हणून काम करणार आहेत.