"कोविड काळात आपले सुद्धा परके होते"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
By अजित मांडके | Published: July 3, 2023 06:01 PM2023-07-03T18:01:00+5:302023-07-03T18:01:32+5:30
गुरुपौर्णिमेनिमित्त ठाण्यातील आनंद आश्रमात शिंदे यांनी आपल्या आमदारांसह बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन गुरुपौर्णिमा साजरी केली.
ठाणे : मी तुमच्यातील मुख्यमंत्री आहे, त्यामुळे रस्त्यावर उतरून जनतेची कामे करीत आहे. मात्र घरात बसून जनतेची कामे होत नाहीत, कोविड काळात तर आपले देखील परके झाले होते, भेट देण्यासही तयार नव्हते. अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली. त्यामुळे आता बऱ्याच जणांच्या विकेट अजून काढायच्या आहेत, असेही ते म्हणाले.
गुरुपौर्णिमेनिमित्त ठाण्यातील आनंद आश्रमात शिंदे यांनी आपल्या आमदारांसह बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन गुरुपौर्णिमा साजरी केली. तसेच यावेळी पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम देखील याठिकाणी पार पडला, यावेळी ते बोलत होते. २०१९ मध्ये युतीचेच सरकार येणार होते. मात्र काहींना सत्तेचा आणि खुर्चीचा मोह आवरला नाही, त्यामुळे ते सरकार येऊ शकले नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
घरात बसून कार्यालयात बसून जनतेची कामे होत नसल्याची टीका देखील त्यांनी ठाकरे यांच्यावर केली. मात्र आता खऱ्या अर्थाने युतीचे सरकार आले असून लोकहिताची कामे केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या सर्वांना एकत्र येऊन काम करायचे आहे. कलाकारांनी देखील कलाकारांसाठी कामे केले पाहिजे. यात कोणत्याही प्रकारचे राजकारण करु नका अशी सुचनाही त्यांनी यावेळी उपस्थित असलेल्या मराठी कलावंतांना केली. कलावंतांच्या अडचणी दूर करा आपण एकत्र काम करु असेही त्यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे गटाला पुन्हा सुरुंग
उद्धव ठाकरे गटाचे नेते शिशीर शिंदे यांच्यासह जळगावचे संपर्क प्रमुख विलास पारकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आता इशान्य मुंबई सह मुलुंड, भांडुप, विक्रोळी आदींसह इतर पट्यात ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. कामाचा झपाटा पाहूनच आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले असल्याचे वक्तव्य यावेळी शिशीर शिंदे आणि विलास पारकर यांनी सांगितले.
मराठी कलावंताचा प्रवेश
यावेळी मराठी सिनेसृष्टीतील हार्दीक जोशी, आदीती सारंगधर, प्रतीक पाटील, अमोल नाईक, माधव देवचाके यांनी शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष सुषांत शेलार आणि उपाध्यक्ष शर्मिष्ठा राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी चित्रपट सेनेच्या लोगोचे अनावरण देखील करण्यात आले.
दिंडोशीत मनेसेला खिंडार
दिंडोशीतील अरुण सुर्वे यांच्यासह २८ हून अधिक शाखा अध्यक्ष, महिला पदाधिकारी आदींसह बहुसंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला.
पुन्हा वाहतुक कोंडी
आनंद आश्रम येथे एकनाथ शिंदे येणार म्हणून सकाळ पासूनच या परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप आले होते. परंतु सुरवातीला काही वेळ याठिकाणाहून धिम्या गतीन वाहतुक सुरु होती. परंतु एकनाथ शिंदे येण्या आधीपासून येथील वाहतुक बंद करण्यात आली होती. त्यामुळे या भागात पुन्हा सुमारे २ तास वाहतुक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.