अडीच दिवसात ७ हजार ५५० किलो निर्माल्य आणि २३५० किलो प्लास्टिक झाले जमा
By अनिकेत घमंडी | Published: September 2, 2022 07:49 PM2022-09-02T19:49:35+5:302022-09-02T19:49:45+5:30
पर्यावरण दक्षता मंडळासह अन्य संस्थांचा निर्माल्य संकलन उपक्रम
डोंबिवली: गणेशोत्सवानिमित्त निर्माल्य संकलन करून त्याचे खत करण्याच्या उद्देशाने पर्यावरण दक्षता मंडळ या संस्थेने डोंबिवली परिसरात महापालिका प्रशासन, शाळा आणि सुमारे शंभर स्वयंसेवकांच्या माध्यमातून यंदाही अडीच दिवसात ७हजार ५५० किलो निर्माल्य संकलित।केले असून २३५० किलो प्लास्टिक जमा केले आहे. यंदाही नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या उपक्रमाला सहकार्य करत निर्माल्य जमा केले आहे.
डोंबिवलीतील पर्यावरण दक्षता मंडळ, ऊर्जा फाऊंडेशन, श्री लक्ष्मी नारायण संस्था। आणि स्वच्छ डोंबिवली अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवलीतील १५ शाळांमध्ये पर्यावरण शाळा उपक्रमांतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सव जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत १५०० हून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करत असताना शाडू गणेशमुर्तीचे महत्त्व, सजावट, विसर्जन, निर्माल्याची व्यवस्था, एकल वापर उत्पादनांमुळे होणारी पर्यावरणाची हानी अशा सर्व मुद्द्यांवर सखोल चर्चा करुन उपाययोजनेविषयी माहिती देण्यात आली.
आपल्या सणांच्या प्रत्येक घटकाचे पर्यावरणपूरक पर्याय काय असू शकतात आणि ते का वापरावेत या विषयावर विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यात आला. या अभियाांतर्गत डोंबिवलीतील ७ शाळांमध्ये पर्यावरणपूरक शाडू मातीची गणेशमुर्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये २५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना निर्माल्य संकलनासाठी कागदी पिशवी तयार करण्याचे प्रत्यक्षिक दाखविण्यात आले. आता ठिकठिकाणी खाडीवरील गणेशघाट तसेच जेथे विसर्जन।केले जाते अशा सर्व ठिकाणी निर्माल्य संकलन केले जात आहे.