उल्हासनगरात समोसाचे पीठ पायाने मळणाऱ्या दुकानावर कारवाईची बडगा
By सदानंद नाईक | Published: March 5, 2024 08:11 PM2024-03-05T20:11:56+5:302024-03-05T20:12:49+5:30
शहरपूर्व आशाळेगाव येथील एका मिठाईच्या दुकानात समोशा व कचोरीचे पीठ पायाने मळण्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
उल्हासनगर: शहरपूर्व आशाळेगाव येथील एका मिठाईच्या दुकानात समोशा व कचोरीचे पीठ पायाने मळण्याचा व्हिडीओ व्हायरल होताच, संतप्त नागरिकांनी दुकानाला घेराव घालून समोशे फेकून दिले होते. मंगळवारी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने दुकानाची पाहणी केल्याने, दुकानावर कारवाईची शक्यता व्यक्त होत आहे.
उल्हासनगर पूर्वेतील आशेळेगाव येथील १५ ते २० वर्ष जुने हरिओम मिठाईच्या दुकानात समोशे व कचोरीचे पीठ पायाने मळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. व्हायरल व्हिडीओ बघून परिसरातील संतप्त नागरिकांनी दुकानाच्या दिशेने धाव घेऊन दुकांनदाराला जाब विचारून कारवाईची मागणी विठ्ठलवाडी पोलिसांकडे केली. तसेच नागरिकांनी दुकानातील समोसा, बजे, कचोरी रस्त्यावर फेकून दिली.
दरम्यान घटनेचे गांभीर्य बघून विठ्ठलवाडी पोलिसांनी झालेला प्रकार अन्न व औषध प्रशासन विभागाला दिली. परिसरातील संतप्त झालेल्या नागरिकामुळे दुकानदाराने सोमवार रात्री पासून बंद केले. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने मंगळवारी आशेळेगाव येथील हरिओम मिठाईच्या दुकानाची पाहणी करून विभागा अंतर्गत कारवाई करण्याचे संकेत दिले. अन्न व औषध प्रशासन विभागाने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली नसल्याने, दुकानावर विभागा अंतर्गत कारवाई होण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली आहे. सोमवार रात्री पासून दुकान बंद असून परिसरातून मिठाईचे दुकान हलविण्याची व त्यावर करवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत. अधिक तपास अन्न व औषध प्रशासन विभाग करीत आहेत.