उल्हासनगरात भाजपाच्या बैठकीत घोटाळ्यावरून, भाजप अध्यक्ष व पदाधिकारी आमने-सामने?
By सदानंद नाईक | Published: February 23, 2024 09:59 PM2024-02-23T21:59:33+5:302024-02-23T21:59:49+5:30
काही सदस्यांना कारणे दाखवा नोटीस दिल्याचा प्रकार उघड झाला आहे.
सदानंद नाईक, उल्हासनगर : भाजप कार्यकारणी बैठकीत पक्षाच्या पदाधिकार्यांनी महापालिका घोटाळ्याच्या प्रकारचे काय झाले? असा प्रश्न विचारताच पदाधिकारी आमने-सामने आल्याचा प्रकार घडला. याबाबत काही सदस्यांना कारणे दाखवा नोटीस दिल्याचा प्रकार उघड झाला आहे.
उल्हासनगर भाजप पदाधिकार्यांची बैठक शहर जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी पक्ष कार्यालयात गुरवारी २२ फेब्रुवारी रोजी बोलाविली होती. बैठक संपल्यानंतर पक्षाचे पदाधिकारी निलेश बोबडे, कपिल अडसूळ यांच्यासह इतर पदाधिकार्यांनी महापालिकेत १०० कोटीचा घोटाळा झाल्याची पत्रकार परिषद पक्षाच्या वतीने गेल्या महिन्यात घेतली होती. तसेच ४२ कोटीच्या मूलभूत सुखसुविधा निधी बाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याचे काय झाले. असा प्रश्न शहरजिल्हाध्यक्ष रामचंदानी यांना विचारल्यावर त्यांच्यात वाद झाला. भाजप बैठकीत शहरजिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या महापालिका घोटाळ्याच्या पत्रकार परिषद वरून वाद झाल्याची चर्चा शहरात रंगली आहे. याबाबत कपिल अडसूळ व निलेश बोबडे यांना संपर्क साधला असता त्यांनी महापालिका घोटाळ्या बाबत घेतलेल्या पत्रकार परिषदेबाबत शहरजिल्हाध्यक्ष यांना प्रश्न केल्यावर वाद झाल्याची कबुली दिली. तसेच पक्षाच्यां वतीने कारणे दाखवा नोटीस देण्यात आल्याचे सांगितले.
भाजप शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांना गुरवारी झालेल्या पक्षाच्या बैठकी बाबत विचारले असता, त्यांनी पक्षाच्या बैठकीत कोणताही वाद झाला नसल्याचे सांगितले. मात्र बैठकीनंतर काही पदाधिकार्यांनी पक्षाच्या नेत्याबाबत अपशब्द वापरल्याने, नोटीस दिल्याची कबुली दिली. गेल्या महिन्यात शहरजिल्हाध्यक्ष रामचंदानी व आमदार कुमार आयलानी यांच्यासह अन्य पदाधिकार्यांनी पत्रकार परिषद घेऊन शहरातील विकास कामात १०० कोटीचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. तसेच शिवसेना शिंदे गटाच्या एका पदाधिकार्यावरही आरोप करून खळबळ उडून दिली होती. मात्र त्यानंतर सर्व प्रकरण थंड बासनात गेल्याची चर्चा शहरातून होत आहे.