उल्हासनगर भाजप बैठकीत शिवसेनेविरोधात सूर; आमदार गणपत गायकवाड यांना सहानुभूती
By सदानंद नाईक | Published: February 10, 2024 06:51 PM2024-02-10T18:51:32+5:302024-02-10T18:52:11+5:30
उल्हासनगरातील टॉउन हॉलमध्ये दोन दिवसांपूर्वी भाजप बुथ पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.
उल्हासनगर : शहरातील टॉउन हॉल मध्ये पार पडलेल्या भाजप बुथ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत कार्यकर्त्यांचा सुर शिवसेना विरोधात होता. याबाबत शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांना संपर्क केला असता त्यांनी काही उत्साही पदाधिकाऱ्यांना बैठकीत शांत केल्याचे सांगितले आहे.
उल्हासनगरातील टॉउन हॉल मध्ये दोन दिवसांपूर्वी भाजप बुथ पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीत लोकसभा निवडणूक बुथबाबत व गाव चलो अभियान याबाबत माहिती देऊन, प्रत्येकाच्या कामाची माहिती दिली. बुथ निहाय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला स्थानिक नेत्यांनी मार्गदर्शन केले. भाजप शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी व आमदार कुमार आयलानी यांनी महायुतीतील कोणत्याही पक्षाला उमेदवारी मिळाली. त्याचा प्रचार करायचे असल्याचे सांगितले. बैठकीच्या सुरुवातीलाच वरिष्ठांनी महायुतीतील कोणत्याही नेत्यांच्या विरोधात बोलण्यास मनाई केली होती. मनाई असतांनाही काही कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटातून होणाऱ्या सक्रियेतेचा पाढा वाचण्यात आला. शिवसेनाबाबत पदाधिकारी व बुथ पदाधित्र्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र वरिष्ठ नेत्यांनी पदाधिकारी व बुथ कार्यकर्त्यांची नाराजी तेथेच मोडीत काढली.
भाजप शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी व आमदार कुमार आयलानी यांच्यासह अन्य पदाधिकार्यांनी गेल्या महिन्यात पत्रकार परिषद घेऊन महापालिकेत होत असलेल्या टेंडर घोटाळ्यावर आरोप केला होता. तसेच शिवसेना शिंदे गटाचे कल्याण उपजिल्हाप्रमुख अरुण अशांन यांच्यावर आरोप केले. त्यानंतर अरुण अशान यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप पदाधिकार्यांची कोंडी केली. या आरोप-प्रत्यारोपाने शिवसेना-भाजपातील वाद चव्हाट्यावर आला. दरम्यान २ फेब्रुवारी रोजी भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याणपूर्वेचे शहरप्रमुख महेश गायकवाड, राहुल पाटील यांच्यावर भर पोलीस ठाण्यात गोळीबार केला. याप्रकारावरून शिवसेना व भाजपातील वाद चव्हाट्यावर आला. गोळीबार प्रकरणी भाजपचे कार्यकर्ते पोलिसांच्या टार्गेटवर आल्याने, त्यांच्यात नाराजी निर्माण झाली. याच नाराजीचा बांध टॉउन हॉल येथील बुथ बैठकीत फुटला. बुथ पदाधिकार्यांनी शिवसेना बाबत नाराजी व्यक्त केली असलीतरी, पक्षाच्या आदेशानुसार सर्वांना महायुतीच्या उमेदवाराचे काम करावे लागणार आहेत. असे शहरजिल्हाध्यक्ष रामचंदानी म्हणाले.
शिवसेना व भाजप अंतर्गत घुमशान
कल्याण लोकसभा क्षेत्रातील विधानसभा मतदारसंघात शिवसेना व भाजप नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांत गोळीबार प्रकरण व महापालिका टेंडर घोटाळ्यावरून आरोप-प्रत्यारोपाचे क्षेत्र रंगले. तसेच अंतर्गत धुमशान असून लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्यातील वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली.