उल्हासनगरात तुटलेल्या झाडावरील पक्षांच्या पिल्लांना अग्निशमन विभागाकडून घरटे; पिल्लेही सुरक्षित
By सदानंद नाईक | Published: May 17, 2024 05:22 PM2024-05-17T17:22:15+5:302024-05-17T17:30:11+5:30
महापालिका अग्निशमन दलाचे कार्य.
सदानंद नाईक, उल्हासनगर : वादळीवाऱ्यामुळे खाली कोसळलेल्या झाडाच्या फांदीवरील पक्षांच्या पिल्याचे घरटे तुटल्याची घटना गुरवारी सायंकाळी घडली. मात्र पिल्लांसाठी नवीन घरटे बांधून त्यामध्ये पिल्ले सुरक्षित ठेवले. तसेच घरटे झाडाला बांधण्याचे काम महापालिका अग्निशमन विभागाच्या जवानांनी केल्याने, त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-५ येथील एका झाडाची मोठी फांदी जोरदार वादळवाऱ्यांनी रस्त्यावर पडली. वाहतुकीला अडथळा नको म्हणून नागरिकांनी झाडाची फांदी छाटून रस्ता मोकळा करण्याची माहिती महापालिका अग्निशमन विभागाला दिली.
अग्निशमन विभागाचे प्रमुख बाळू नेटके यांच्या आदेशाने विभागाचे कर्मचारी झाडाची फांदी छाटत असतांना तुटलेल्या घरट्यात दोन लहान पिल्ले दिसली. स्थानिक रहिवासी व द समर्पण फाउंडेशनचे पदाधिकारी विशाल एडके यानी अग्निशमन दलाच्या पिल्यासाठी एक घरटे बांधून दिले. बनविलेल्या नवीन घरट्यात महापालिका कर्मचाऱ्यांनी झाडावर लावून त्यामध्ये पिल्ले ठेवून त्यांना जीवदान देण्यात आले. याप्रकाराची माहिती महापालिका आयुक्त अजीज शेख यांना मिळाल्यावर त्यांनी अग्निशमन दलाचे प्रमुख बाळू नेटके व इतर कर्मचाऱ्यांचे कौतुक करून पाठीवर शाबासकीची थाप मारली आहे.